Breaking News

सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण उलगडणार ?

 


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी येत्या 24 तासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सुशांतचा व्हिसेरा अहवाल गुरुवारी येणार आहे. सुशांतच्या 20 टक्के व्हिसेरावर आधारित हा अहवाल असेल, तर उर्वरित 80 टक्के व्हिसेरा हे मुंबई पोलिसांकडून तपासले गेले आहेत. या अहवालावर आधी फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स टीम चर्चा करणार आहे. त्यानंतर हा रिपोर्ट एम्सच्या डॉक्टर्सकडे सोपवला जाणार आहे.  

सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याबाबत सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. सुशांत सिंह प्रकरणात आतापर्यंत त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह तिच्या भावाला अटक केली आहे.  

सुशांतच्या कुटुंबीयांने सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा वाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्यात आले. आता व्हिसेरा अहवाल आल्यानंतर ही हत्या होती की आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे.

सुशांतने आत्महत्या केली नसून त्याला ड्रग्ज देऊन मारल्याचा दावा सुद्धा अनेकांनी केला. याविषयीसुद्धा महत्वाची माहिती या अहवालातून समोर येण्याची शक्यता आहे. हा अहवाल एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाला मिळाल्यानंतर याविषयी एक महत्त्वाची बैठकही होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अहवालातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.