Breaking News

इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्हावेत 'हे' बदल, या दिग्गजाचा सल्ला

 

नवी दिल्ली। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघात नुकत्याच झालेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने १० वर्षानंतर प्रथमच द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. मालिकेत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस यांनी आयसीसीला कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

युनिसने आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात कसोटी क्रिकेटमध्ये एकाच ब्रँडचा बॉल वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा विश्वास आहे की वेगवान गोलंदाजांना जगभरात वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये स्वतःला सामावून घेण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून जर सामना एकाच ब्रँडच्या बॉलने खेळला तर खेळाडू अधिक सहज असतील.

पाकिस्तानी क्रिकेट संघाने ड्यूक या चेंडूने नुकतीच झालेली मालिका खेळली, ज्यामध्ये त्यांनी तीन सामन्यांची कसोटी मालिका ०-१ ने गमावली.

कसोटी क्रिकेटमध्ये हा बदल करू इच्छितात वकार युनिस

वकार युनिस यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी लिहिलेल्या स्तंभात म्हटले आहे की, "मी बऱ्याच वर्षांपासून ड्यूक बॉलचा मोठा चाहता आहे. परंतु मला वाटते की कसोटी क्रिकेटसाठी जगभर केवळ एकाच ब्रँडच्या बॉलचा वापर करावा."

आयसीसीसाठी बनवले नियम

कुकाबुरा आणि एसजी चेंडू ड्यूकच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वापरले जाते. भारतीय संघ एसजी चेंडू, तर इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज ड्यूक चेंडू आणि इतर देश कुकाबुरा वापरतात.

त्यांनी लिहिले, "कोणत्या ब्रँडला काही फरक पडत नाही. परंतु आयसीसीने निर्णय घेतला पाहिजे. जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूंचा वापर करून गोलंदाजांना स्वतःला सामावून घेणे कठीण जाते."

इंग्लंडमध्ये लाळेला बंदी असूनही कोणतीच समस्या आली नाही

आयसीसीने कोव्हिड-१९ च्या साथीमुळे चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घातली होती. युनिस यांनी म्हटले की इंग्लंडमध्ये हवामानामुळे कोणतीही समस्या आली नाही.

ते म्हणाले, "अलीकडील कसोटी मालिकेदरम्यान सर्वात मोठे आव्हान म्हणजे लाळेच्या वापरावर निर्बंध घालणे होय. मला वाटत नाही की इंग्लंडमधील हवामानाकडे पाहता हा मोठा मुद्दा असेल."