Breaking News

चोर चोरी करायला गेला आणि एसीच्या गारव्यात गाढ झोपला !

 चोर चोरी करायला गेला आणि एसीच्या गारव्यात गाढ झोपला !बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण विचार करा की, असं जर चोराने केलं तर. अशीच एक घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करायला गेला आणि एसीच्या गारव्यात गाढ झोपला. त्याचं पुढे काय झालं ते जाणून घेऊ.

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात २२ वर्षीय चोर एका घरात चोरी करण्यासाठी गेला होता. यावेळी घरात एसी सुरू असल्याने तो तिथेच झोपला. बाबू असं या चोराचं नाव असून तो पेट्रोल पंपाचा मालक असलेल्या व्यक्तीकडे चोरी करायला गेला होता. चोरी करायला जाण्याआधी त्याने घराची रेकी केली होती.

बाबूने १२ सप्टेंबरला चोरी करण्याचा प्लॅन केला आणि त्यानुसार तो पहाटे ४ वाजता घरात शिरला. तो घराचा मालक सत्ती वेंकट रेड्डीच्या रूममध्ये शिरला. सगळंकाही ठरलेल्या प्लॅननुसार सुरू होतं. पण एसीच्या गारव्याने त्याला झोप लागली. पोलिसांनी सांगितले की, 'एसी सुरू असल्याने झोप घेण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही.

बाबूने विचार केला होता की, घराच्या मालकाच्या बेडवर एक छोटीशी झोप घेऊन तो घरातील सगळा माल लंपास करून पळेल. पण एसीच्या गारव्यामुळे त्याला गाढ झोप लागली आणि तो इथेच फसला. अशात बाबूच्या घोरण्याचा आवाज रेड्डी यांना गेला आणि त्यांनी त्याला रूममध्ये लॉक करून ठेवले. त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस ७ वाजता आले.

पोलिसांनी सांगितले की, आमची टीम तिथे पोहोचल्यावर त्याने स्वत:ला रूममध्ये बंद करून घेतले होते. काही वेळानंतर त्याला पकडण्यात आले. चौकशीतून समोर आले की, बाबू हा काही प्रोफेशनल चोर नव्हता. त्याने आर्थिक अडचणीमुळे हा चोरीचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय.