Breaking News

कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा

- उद्धव ठाकरेंची बदनामी; अब्रूनुकसानीचा खटला चालणार

Kangana Ranaut

मुंबई/ प्रतिनिधी 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करणार्‍या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाचा पाली हिल येथील बंगल्याचे बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांची बदनामी केल्याचा तक्रारदार अ‍ॅडव्होकेट नितीन माने यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याच नितीन माने यांनी सांगितले. कंगना राणावत ही मुंबईत पोहोचली आहे. मात्र, तिने आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. यावेळी कंगनाने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप विक्रोळी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीसोबत मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका करतानाचा कंगनाच्या व्हिडीओचे ट्विटही जोडण्यात आलेले आहेत.