Breaking News

पत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर!

पत्नीचा  खून केल्याच्या आरोपातील पतीला  हायकोर्टात जामीन मंजूर!अकोले/ प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे याने आपल्या २५ वर्षाच्या वैवाहीक आयुष्यानंतर देखील व पोटी दोन मुले व मुलगी असे तीन सज्ञान अपत्य असतानाही पत्नीस शारीरीक, मानसिक त्रास देऊन व डोक्यावर टणक हत्याराने मारहाण करुन खून केल्याच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.

  याबाबत सविस्तर हकिगत अशी की, अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील पुंजा पाटील आवारी यांची मुलगी सविता हियेबरोबर २५
वर्षापुर्वी चैतन्यपुर तालुका , अकोले येथिल आरोपी भगवान भाऊ हुलवळे याचा विवाह झाला. उभयतांना एक मुलगी व दोन मुले असे सज्ञान अपत्य आहेत. मुलीचा विवाह झाला आहे. आपल्या २५ वर्षाच्या वैवाहीक आयुष्यानंतर देखील भगवान भाऊ हुलवळे हा पत्नीस शारीरीक, मानसिक त्रास देतो. या २५ वर्षाच्या कालावधीत आरोपी नवरा भगवान याने पत्नी सविता हिस अनेक वेळा मारहाण केली. तसेच ती आजारी पडली असता तिला वैद्यकीय उपचार न देणे, या व इतर अनेक कारणांवरुन सविता हिचा छळ होत होता. या कारणास्तव सविता ही अनेक महिने माहेरी जाऊन राहिली होती. शेवटी पत्नी सवितास चांगले नांदविण्याची लेखी हमी पती भगवान याने दिल्यानंतर सविता ही जानेवारी २०१८ मध्ये आपल्या सासरी नांदण्यास आली होती. दरम्यान कोवीड-१९ या संसर्ग जन्य रोगाच्या साथीमुळे मुले सुधाकर व तुषार ही घरी आली होती. त्यानंतर २५ मार्च २०२० रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान तुषार याने सविताचे वडील पुंजा आवारी यांना फोन करुन आई सविता गोठयात गाईचे दूध काढत असतांना तिला गाईने मारले आहे,  असा निरोप दिला. त्यामुळे पुंजा आवारी हे नातेवाईकांसह चैतन्यपुर येथे गेले असता आरोपी भगवान याने सविताचा मृतदेह घरात आणून ठेवला होता व मृतदेहावर पोस्टमार्टम न करता अंत्यविधी करण्याचा आग्रह करत होता. 

   एकंदरीत परिस्थिती पाहून पुंजा आवारी यांना सविता हिचे अपघाती मृत्यूबाबत शंका निर्माण झाली व त्यांनी ग्रामीण रुग्णालय अकोले येथे सविताच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करून घेतले. तसेच आरोपी भगवान यानेच कौटुंबिक कारणास्तव भांडण होवुन सविताचे डोक्यावर मारहाण करुन तिचा खून केला आहे,  अशी फिर्याद अकोले पोटीस ठाण्यात दाखल केली. पोलीस तपासा दरम्यान आरोपी भगवान व पत्नी मयत सविता हे गायांचे दूध काढत असतांना आरोपीचा मुंबई येथे राहणारा भाऊ शांताराम यास सहकुटुंब गावी बोलविण्याच्या विषयावरुन आरोपी व मयत सवितामध्ये मतभेत झाले. यात मयत सविता हिने त्याकरीता नकार दिला, याचा राग आरोपी यास आला व त्याने लाकही दांड्याने सविताच्या होक्यावर मारले. त्यामूळे ती जखमी होऊन मृत्यू पावली. पुरावा नाहीसा करण्याचे दृष्टीने आरोपी भगवान याने गुन्ह्याकामी वापरलेले हत्यार लाकडी दांडा जाळून टाकला व त्याची राख खड्यात पुरली होती, असे निष्पन्न झाले. पोलीसांकडून या गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन गुन्ह्याचे तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपी विरुध्द संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

 दरम्यान आरोपीचे वतीने जामीन मिळणेकरीता संगमनेर जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे आरोपीने औरंगाबाद येथील वकील विक्रम धोर्डे, अँड. विठ्ठल गुंड व अॅड. अनिलकुमार आरोटे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. यात आरोपी तर्फे युक्तीवाद करण्यात आला की, आरोपी शिवाय इतर चार माणसे तेथे हजर होती. तसेच वैद्यकीय अधिका-यांनी चार प्रकारे अभिप्राय दिले. यात मयत सविता हिस झालेली जखम तिला गाईने मारत्यामुळे देखील होऊ शकते असाही अभिप्राय दिला. आरोपी तर्फे केलेला युक्तीवाद विचारात घेवून न्यायमूर्ती व्ही. आर. जाधव यांनी आरोपी भगवान यास जामीनावर खुले करणे कामी आदेश दिला आहे.

------