Breaking News

अकोल्यात शेतकरी विरोधी कायद्यांची होळी !

अकोल्यात शेतकरी विरोधी कायद्यांची होळी.


अकोले/ प्रतिनिधी :
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याच्या आवाहनानुसार आज अकोल्यात मोर्चा काढून कायद्याच्या प्रति जाळत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

अखिल भारतीय किसान सभा (मा.क.प.) अखिल भारतीय किसान सभा (भा. क.प.) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा स्वाभिमान आदी संघटनांनी अकोलेत शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी करत जोरदार आंदोलन केले.

वसंत मार्केट समोरील परिसरात केंद्राच्या कृषी कायद्यांच्या प्रतिची यावेळी होळी करण्यात आली. मानवी साखळी करत केंद्र सरकारच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. शहरातून मोर्चा काढत यावेळी शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहमटे, कारभारी उगले, डॉ.अजित नवले, विनय सावंत, शांताराम वाळुंज, मच्छिंद्र धुमाळ, आनंदराव नवले, महेश नवले, चंद्रकांत नेहे, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, हेरंब कुलकर्णी, संपत नाईकवाडी, विनोद हांडे, लक्ष्मण नवले, विलास नवले, सुरेश नवले, ज्ञानेश्वर काकड, गणेश ताजणे आदींची यावेळी भाषणे झाली.


केंद्र सरकारच्या कायद्या संदर्भात सरकारची भाषा शेतकऱ्यांना मुक्त करण्याची करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यां ऐवजी सरकार आपल्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होत आहे. कृषी कायद्यांच्या आडून बाजार समित्या उध्वस्त करण्याचे, हमी भावाचे संरक्षण नष्ट करण्याचे व कॉर्पोरेट कंपन्या व निर्यातदारांना शेती व शेतकऱ्यांची लूट करण्याची खुली सूट देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणांचा आज देशभर विरोध होत आहे. अकोल्यात आज सर्व शेतकरी हितेशी संघटना एकत्र आल्या आहेत अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
केंद्र सरकारचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार कार्यालयाला यावेळी देण्यात आले.
--