Breaking News

आठवलेंच्या ऑफरवर पवारांच्या कानपिचक्या, रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का?

 


पंढरपूर : शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी ऑफर देणारे रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी फटकारलं. आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का? असा उपरोधित सवाल पवारांनी विचारला. पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. 

'केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. राज्यसभेतही नाही आणि बाहेरही नाही. त्यांचा एकही आमदार नाही, खासदार नाही' असा टोला शरद पवारांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

रिपाइंचा विधानसभेत एकही आमदार नाही, तसेच लोकसभेतही त्यांचा खासदार निवडून आलेला नाही. रामदास आठवले हे पक्षाचे राज्यसभेवरील एकमेव खासदार आहेत. तर मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात.


आठवले काय म्हणाले होते?

'संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-रिपाइंचं सरकार बनवावं. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावं. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावं आणि सरकार स्थापन करावं.' असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी मांडला होता.


सीबीआयवर पवारांचा निशाणा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा उपरोधिक सवालही शरद पवारांनी विचारला. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले होते. जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.


अनलॉकमध्ये काय काय सुरु करायचे ते आरोग्य खाते ठरवेल

अनलॉकबाबत बोलताना शरद पवारांनी, 'काय काय सुरु करायचे ते आरोग्य खाते ठरवेल', असे स्पष्ट केले आहे. देश पातळीवर कृषी विधेयकाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत पवारांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्लाही शरद पवारांनी दिला.  


संजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेटीचा वेगळा अर्थ काढू नये

शरद पवारांनी संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात देखील वक्तव्य केले. 'संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊतांनी पहिली मुलाखत माझी घेतली. त्याच मुलाखातीत त्यांनी मला सांगितलं की, पुढची मुलाखात मी उद्धव ठाकरे आणि नंतर भाजप नेत्यांची घेणार आहे' असं पवार म्हणाले.