Breaking News

२४ तासांत ४२४ पोलिसांना कोरोनाची लागण; आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा !

 Now, 237 Maharashtra Police personnel test positive for COVID-19 |  Maharashtra News | Zee News

मुंबई : अनलॉकच्या काळात पोलिसांभोवती कोरोनाचे संकट वाढत असताना, गेल्या २४ तासांत सव्वा चारशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तर पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मृत्यूचा आकडा १६३ वर पोहचला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत वाढताना दिसत आहे.

राज्यभरात १६ हजार १५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात, १ हजार ७३६ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर यापैकी १३२६ पोलीस अधिकारी आणि ११६८८ पोलीस कर्मचारी असे एकूण १३ हजार १४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ हजार ८३८ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.

यात, धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत यात ४२४ पोलिसांची भर पडली. आतापर्यंत दिवसाला तीनशे ते साडे तीनशेचा पल्ला गाठणाऱ्या कोरोनाबाधित पोलिसांच्या आकडयाने चारशेचा आकड़ा पार केल्याने पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची भिती वाढताना दिसत आहे. तर ५ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यात, ठाणे, नवी मुंबई, नागपुर ग्रामीण, नांदेड़ आणि वर्धा येथील पोलिसांचा समावेश आहे. सुरूवातीला मुंबई पोलीस दलात वाढणाऱ्या कोरोनाबाधित पोलिसांचा आकड़ा कमी होत असताना राज्यभरात हा आकड़ा डोके वर काढत आहे. त्यामुळे पोलिसांच्या चिंतेत भर पडत आहे.

अनलॉकचा फटका

जून पासून सुरु झालेल्या अनलॉकच्या टप्प्यामुळे राहदारी वाढली. यात रस्त्यावर उभ राहून ऑन ड्यूटी २४ तास असणाऱ्या पोलिसांचा नागरिकांशी संपर्क वाढला. त्यामुळे पोलिसांभोवतीचे संकट वाढत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांचे म्हणणे आहे. तर काही ठिकाणी पोलिसांसाठी आणखीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.