Breaking News

COVID-19 vaccine काउंटडाऊन सुरू!

- ’कोविशिल्ड’ लस तिसर्‍या टप्प्यात

- पुण्यात 4 हॉस्पिटलमध्ये मिळणार डोस

पुणे/ प्रतिनिधी

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात सध्या जास्तीत जास्त टेस्टिंगवरही भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्मिती केलेली कोविशिल्ड लसचे काम तिसर्‍या टप्प्यात आहे. या लसीच्या तिसर्‍या टप्प्याला ससून हॉस्पिटलमधून सुरूवात होणार आहे. 

ससूनकडून स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात ससूनसह 4 हॉस्पिटलमध्ये डोस दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे तिसर्‍या टप्प्यात देशभरात दीड हजार स्वयंसेवकांवर कोविशिल्ड लसीचा चाचणी होणार आहे. कोरोनाला हरवणारी लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे, असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला होता. तसेच दोन महिन्यांत कंपनी लसीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सपर्ड विद्यापीठात यापूर्वीच करार झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि गवी यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांनी दिली आहे.


21 हून अधिक लशीची क्लिनिकल ट्रायल सुरू

दरम्यान, कोरोना व्हायरस लस विकसित करण्यासाठी 200 हून अधिक कंपन्या काम करत आहेत. यातील 21 पेक्षा जास्त लसी क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर तयार केलेली लसदेखील यापैकी एक आहे. ही लस मानवी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. भारतात, ते कोविशिल्ड या नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुरू करणार आहेत. ही लस लवकरच जनतेसाठी उपलब्ध होईल, असा कंपनीचा दावा आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाव्यतिरिक्त, कंपनी नोव्हावाक्स लस देखील तयार करेल.