Breaking News

IPL MI vs RCB : विराटला हरवण्यासाठी आज रोहितचा 'हा' हुकुमी एक्का वर्षभरानंतर करणार गोलंदाजी?

 


दुबई : आज आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार आणि उप-कर्णधार यांच्या लढत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  विरुद्ध मुंबई इंडियन्स एकमेकांशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघानी या हंगामात एक सामना गमावला आहे तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान, गेल्या सामन्यात रोहित शर्मानं आक्रमक अर्धशतकी खेळी केली होती, मात्र कर्णधार विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही आहे.

गेल्या दोन सामन्यात विराटनं केवळ 15 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल तर दुसरीकडे विराटला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्स आपल्या एका हुकुमी एक्क्याला गोलंदाजी देण्यासाठी उत्सुक असतील. मुंबई इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक असला तरी या हंगामातील दोन सामन्यात त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही.


पाठीच्या दुखापतीमुळे तब्बल वर्षभर पांड्या क्रिकेट खेळू शकला नव्हता. नोव्हेंबर 2019मध्ये लंडनमध्ये पांड्याची सर्जरी झाली होती. त्यानंतर आता तो आयपीएल खेळत आहे. मात्र मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच जहीर खाननं पांड्या गोलंदाजी करणार की नाही, याबाबत खुलासा केला आहे. जहीरनं सांगितले की, "आम्हालाही अपेक्षा आहे की हार्दिकनं गोलंदाजी करावी. तो असा खेळाडू आहे ज्यामुळे संघात संतुलन राहते". जहीर असेलही म्हणाला की, "हार्दिकला गोलंदाजी देण्याआधी त्याचे फिटनेस पाहावे लागेल. हार्दिकही गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र संयम ठेवावा लागेल. घाई करून चालणार आहे".


हार्दिकने कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दोन सामन्यात 18 आणि 14 धावांची खेळी केली होती. मात्र या दोन्ही सामन्यात हार्दिकला गोलंदाजी दिली नाही. तर दुसरीकडे 2015नंतर पहिल्यांदाच केरन पोलार्डनं गोलंदाजी केली.