Breaking News

IPL2020 : बेंगळुरूचा मुंबईवर "सुपर' विजय

 


दुबई - इशान किशन व कॅरन पोलार्ड यांच्या वादळी खेळीनंतरही मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यातील सामना टाय झाला. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरू संघाने विजय मिळवला.

विजयासाठी 201 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची अवस्था एक वेळ 4 बाद 78 अशी बिकट झाली होती. त्याचवेळी किशन व पोलार्ड यांनी चौकार व षटकारांची आतषबाजी करत अशक्‍यप्राय वाटणारा विजय दृष्टिक्षेपात आणला. मात्र, किशन 99 धावांवर बाद झाला आणि आश्‍चर्यकारकरित्या सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये मुंबई संघाने 7 धावा केल्या होत्या त्या पार करत बेंगळुरूने विजयाची नोंद केली.

तत्पूर्वी, ऍरन फिंच, देवदत्त पडीक्कल, एबी डीविलियर्स व शिवम दुबे यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रथमच रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने द्विशतकी धावसंख्येपर्यंत मजल मारली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सोमवारी झालेल्या सामन्यात त्यांनी 3 गडी गमावून 201 धावा केल्या. याही सामन्यात बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला आपयश आले. तो केवळ तीन धावा काढून बाद झाल्याने पुन्हा एकदा त्याच्यावर टीका सुरू झाली आहे.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. या हायव्होल्टेज सामन्यात बेंगळुरूने गेल्या काही सामन्यांत झालेल्या चुका दुरुस्त केल्याचे दिसून आले. सलामीवीर ऍरन फिंच व देवदत्त पडीक्कल यांनी आक्रमक खेळ करत संघाला 81 धावांची सलामी दिली. पडीक्कलपेक्षा फिंच जास्त आक्रमक होता. त्याने थाटात अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 35 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावून 52 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली याने पुन्हा एकदा निराशा केली.

सातत्याने येत असलेल्या अपयशाने त्याची पाठ याही सामन्यात सोडली नाही. तो केवळ 3 धावा काढून बाद झाला. त्यासाठी देखील त्याला 11 चेंडू खेळावे लागले. पडीक्कलने मात्र आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करताना अर्धशतकी खेळी केली. तो बाद झाल्यावर डीविलियर्सने धावांचा वेग वाढवला. त्याला शिवम दुबेने योग्य साथ दिली. या जोडीने अखेरच्या 5 षटकांत 78 धावा वसूल केल्या व संघाला द्विशतकी मजल मारून दिली. डीविलियर्सने 24 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 55, तर दुबेने केवळ 10 चेंडूत 1 चौकार व 3 षटकार फटकावताना नाबाद 27 धावा केल्या.

ठळक घडामोडी :-

 • इशान किशनची खेळी व्यर्थ
 • मुंबईच्या हातातील विजय निसटला
 • बेंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला
 • सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या फलंदाजांकडून निराशा
 • कोहलीवर पुन्हा एकदा समालोचकांची टीका
 • जबाबदारीचे भान नसल्याचे इरफान पठाणकडून ताशेरे
 • यंदाच्या स्पर्धेतील तीन सामन्यांतून केवळ 18 धावा
 • ऍरन फिंचचे 31 चेंडूत अर्धशतक
 • देवदत्त पडीक्कलचेही अर्धशतक
 • तीन सामन्यांत पडीक्कलची दोन अर्धशतके
 • डीविलियर्सचेही नाबाद अर्धशतक
 • शिवम दुबेच्या केवळ 10 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 27 धावा
 • बेंगळुरूच्या प्रथमच द्विशतकी धावा

संक्षिप्त धावफलक :

रॉयल चॅलेंजर बेंगळुरू - 20 षटकांत 3 बाद 201 धावा. (ऍरन फिंच 52, देवदत्त पडीक्कल 54, एबी डीविलियर्स नाबाद 55, शिवम दुबे नाबाद 27, विराट कोहली 3, ट्रेन्ट बोल्ट 2-34, राहुल चहर 1-31).
मुंबई इंडियन्स - 20 षटकांत 5 बाद 201 धावा. (इशान किशन 99, कॅरन पोलार्ड नाबाद 60, इसुरू उदाना 2-45).