Breaking News

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

- पैशाची ओढाताण आहे तरीही दिवाळीपूर्वी पैसे देणार

- केंद्राकडून अजून 38 हजार कोटी रुपये आले नाहीत!

- शेतकर्‍यांना 10 हजार कोटींचे मदत पॅकेज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई/ प्रतिनिधी

अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.  संकटामागून संकट आली आहेत. शेतकर्‍यांना आतापर्यंत 30 हजार 800 कोटी दिले आहेत. संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी आहे. केंद्राकडून अद्याप पैसे आलेले नाहीत. 38 हजार कोटी केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत. मात्र, राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना 10 हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिली.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. त्यावेळी शेतकर्‍यांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 10 हजार कोटी रुपयांचे नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केली आहे. दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. केंद्राकडून किती पैसे येणे बाकी आहे याची माहिती घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदतीची घोषणा करताना शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत देण्याचे सांगितले आहे. एकूण केंद्राकडून येणे 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत. अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्‍चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल.  पैशाची ओढाताण आहे, पण शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी 18 हजार  रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

असे असेल पॅकेज

1. शेतीपिकासाठी : जिरायत व बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)

2. फळपिकांसाठी : फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)

3. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल

4. रस्ते पूल - 2635 कोटी

5. नगर विकास - 300 कोटी

6. महावितरण उर्जा - 239 कोटी

7. जलसंपदा - 102 कोटी

8. ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा - 1000 कोटी

9. कृषी शेती घरांसाठी - 5500 कोटी

----------------