Breaking News

राज्यपालनियुक्त 12 जागांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

 - शिवभोजन थाळी मार्च महिन्यापर्यंत 5 रुपयांत पुरवण्याचा निर्णय


मुंबई/ प्रतिनिधी

विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रस्ताव आला, तो एकमताने मंजूर झाला, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच महाविकास आघाडी सरकारकडून याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाईल. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी आणि कांद्याच्या प्रश्‍नावरही चर्चा झाली. त्यानुसार, शिवभोजन थाळी मार्च महिन्यापर्यंत 5 रुपयांत पुरवण्याचा निर्णय झाला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी कांदा उत्पादकांशी चर्चा करुन तोडगा काढतील, अशी माहितीही भुजबळ यांनी प्रसारमध्यांना दिली. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे आणि नाशिकमधील कांदा उत्पादक, शेतकर्‍यांची चर्चा सुरु आहे. यावेळी कांदा उत्पादकांकडून साठवणुकीवरील मर्यादा हटवण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या जागा भरण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली होती. यापैकी काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशीत विधानपरिषदेची उमेदवारी सचिन सावंत यांची निवड झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय, मुजफ्फर हुसेन, रजनी पाटील आणि अनिरुद्ध वनकर यांनाही काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी कधी पाठवणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.