Breaking News

सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार; 2 जवान शहीद

 - काश्मिरात दहशतवादी हल्ले सुरुच; तीन जवान जखमीश्रीनगर/ प्रतिनिधी

काश्मिरात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर बेछुट गोळीबार केला. पुलवामा जिल्ह्यातील पांपोर येथे हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून, तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. 

सीआरपीएफच्या 110 व्या बटालियन आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिस दलाचे संयुक्त पथक घटनास्थळाहून जात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी मार्ग अडवून अचानक बेछुट गोळीबार केला. त्यात दोन जवान शहीद झाले. जवानांनीदेखील या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्षा जवानांनी तातडीने नाकाबंदी करत परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोराच्या संबुरा परिसरात चकमक उडाली होती. यात संयुक्त पथकाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि लष्करी ताफ्यांवर दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. 16 ऑगस्ट रोजी बारामुलाच्या पट्टन परिसरातसुद्धा सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 2 जवान शहीद झाले होते. तर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले.

-------------------------