Breaking News

पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचे 28 बळी

23 जिल्ह्यातील साडेचार हेक्टरवरील पिकांची नासाडी

- कमी दाबाचा पट्टा हटला, मोठ्या पावसाची शक्यता टळली


पुणे/ प्रतिनिधी 

परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, कोकणाला जोरदार झोडपले. झालेल्या अतिवृष्टीने हाताशी आलेले पीक पाण्याखाली गेले. पावसामुळे आर्थिक नुकसान झालेच पण सोबतच मोठी जीवितहानीदेखील झाली. पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यात एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे असून, एक जण बेपत्ता आहे.

अतिवृष्टीच्या पावसाने ओढे, नाले, नद्यांना महापूर आले. तसेच, मोठ्या धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे आतापर्यंत जवळपास 29 हजार 292 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. यात पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 17 हजार नागरिकांचा समावेश आहे. तर 57 हजार 354 हेक्टर क्षेत्रातील पीक जमीनदोस्त झाले आहे. याशिवाय, 2319 घरांची पडझड किंवा मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात 513 जनावरे नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहेत. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या 4 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अ‍ॅलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार 23 जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे.