Breaking News

3 नोव्हेंबरपासून राज्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

- मुंबईत ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीची घोषणा

- राज्यात एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही : प्रकाश शेंडगे


मुंबई/ खास प्रतिनिधी

मराठा आरक्षणावरून राज्यभरात मराठाविरुद्ध ओबीसी (इतर मागासवर्ग) असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठ्यांचा ओबीसीत समावेशास ओबीसींनी तीव्र विरोध चालवला आहे. राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पेटणार असून, आम्ही राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयांना याबाबतचे निवेदनदेखील देणार असल्याची घोषणा शनिवारी ओबीसी- व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी दामोदर तांडेल, चंद्रकांत बावकर, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नतीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शांताराम दिघे, जीडी तांडेल उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, सध्या राज्यभरात मराठा समाजातील काही प्रमुख नेते मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी कोट्यातून द्या, अशी मागणी करत आहेत. याला सर्व ओबीसी समाजाचा विरोध आहे. ज्यावेळी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले होते. त्याचवेळी आम्हांला माहिती होते की हे आरक्षण टिकणारे आरक्षण नाही. त्यामुळेच आम्ही सरकारकडे विचारणा केली होती की, जर एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मग सरकार पुढचे पाऊल काय टाकणार आहे. परंतु, सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता आली नाही. आज परिस्थिती पाहिली तर वेगळी आहे. आता मराठा समाजातील काही प्रमुख नेते उघड उघड ओबीसी समाजातून आरक्षण देण्याबाबत बोलत आहेत. त्यामुळे याबाबत सरकारने स्पष्टता आणावी आणि लवकरात लवकर मराठा समाजातील या नेत्यांना बोलावून ओबीसी कोट्यातुन मराठा समाजाला आरक्षण देणार नसल्याची बाब माहिती करून द्यावी. सध्या राज्यभरात ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत, त्यावरून आम्ही आता 3 नोव्हेंबरपासून राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार आहोत. या माध्यमातून राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयात आमचे कार्यकर्ते जाऊन तहसीलदारांना निवेदने देतील. यामध्ये प्रामुख्याने आम्ही ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, ओबीसी समाजालादेखील मराठा समाजाला ज्या पद्दतीने निधी दिला आहे. त्याच पद्धतीने निधी द्यावा. अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकाश शेंडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश शेंडगे हे ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, सध्या राज्यभरात अनेक मराठा हे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याबाबत भूमिका घेत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे उलट माझ्यावर आरोप करण्यापेक्षा जयंत पाटील यांनी त्या नेत्यांची समजूत काढावी. आपोआपच आमचा विरोध मावळल्याचे पाहिला मिळेल. प्रकाश शेंडगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे छत्रपती यांनाही टोला लगावला. दोन्हीही छत्रपतींनी केवळ मराठा समाजासाठी न झटता सर्व समाजासाठी झटावे, असे ते म्हणाले.

.. तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही!

यावेळी प्रकाश शेंडगे यांनी आपले मत रोखठोकपणे मांडले. मराठा समाज जेंव्हा सरकारकडे जातो तेंव्हा सरकार त्यांना तातडीने प्रतिसाद देते. मराठा समाजाला सरकार वेगळे 13 टक्के आरक्षण देत असेल तर आमची काहीही हरकत नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला किंवा त्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर मात्र राज्यात एकही मंत्र्याला फिरकू देणार नाही, असा सज्जड दम प्रकाश शेंडगे यांनी सरकारला भरला.