Breaking News

80 वर्षांचे पवार निघालेत मराठवाड्यात; मुख्यमंत्रीही आज सोलापूर दौर्‍यावर!

 - ओला दुष्काळ!

- शरद पवार आजपासून मराठवाडा दौर्‍यावर

- अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा घेणार आढावा

- पावसामुळे पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान


मुंबई/ विशेष प्रतिनिधी 

वय वर्षे 80 असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर निघाले आहेत. पवार हे रविवारपासून मराठवाडा दौर्‍यावर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत, तर 60 वर्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकार्‍यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत. दरम्यान, विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उशिरा सोलापूर दौरा जाहीर केला.

महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असून, मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अशा स्थितीत ते मात्र घरात बसून महाराष्ट्राच्या नकाशावर पूरस्थितीची पाहणी करत आहेत. आंध्र, ओडिशा आणि तेलंगणाला अशाच अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्या केल्या. हवाई दौरे काढले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस, नीतेश राणे यांनीही ही या मुद्द्यावरून टीका करून झाली. फडणवीस हेदेखील रविवारपासून अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार आहेत. आता 80 वर्षांचे पवार दौरा करून मुख्यमंत्र्यांपुढे उदाहरण घालून देत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शरद पवार हे दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौर्‍यावर असणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून, पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.


ओला दुष्काळ जाहीर करा : फडणवीस

दुसरीकडे, शेतकर्‍याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.