Breaking News

चक्रवाढ व्याजमाफी योजनेतून कृषीकर्जे डावलली

- केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना झटका

- शेतकर्‍यांत मोदी सरकारविरुद्ध संतापाची लाट

- पीककर्ज आणि ट्रॅक्टरच्या कर्जावरील व्याजाचा कॅशबॅक नाही : अर्थ मंत्रालय


नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

वादळ आणि अतिवृष्टी अशा अस्मानी संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकारने केला आहे. करोना संकटात कर्जहप्ते स्थगित करून त्यावरील चक्रवाढ व्याज माफी जाहीर करणार्‍या केंद्र सरकारने या योजनेतून शेतकर्‍यांना मात्र वगळले आहे. चक्रवाढ व्याजमाफीतून कृषीकर्जे वगळण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे शेतकर्‍यांना चक्रवाढ व्याजमाफीपासून वंचित रहावे लागणार असून, त्या व्याजाचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांत संतापाची लाट उसळली आहे.

करोना संकटात कर्जदारांना दिलासा देणार्‍या केंद्र सरकारच्या चक्रवाढ व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेकडून अध्यादेश जारी करण्यात आला. कर्जदारांना दिलासा देणारी ही योजना येत्या 5 नोव्हेंबर रोजी लागू होणार आहे. बँकांना तसेच वित्त संस्थांना चक्रवाढ व्याजाची माफ केलेली रक्कम 5 नोव्हेंबरपासून कर्जदाराच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर या रकमेची बँकांना 12 डिसेंबरपर्यंत सरकारकडे मागणी करता येईल. यामुळे केंद्राच्या तिजोरीवर साडेसहा हजार ते सात हजार कोटींचा अतिरिक्त भर येण्याची शक्यता आहे. नुकतेच अर्थ मंत्रालयाने या योजनेसंबधी वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे (एफएक्यू) बुधवारी प्रसिद्ध केली. यामध्ये व्याजावरील व्याजमाफी देण्यासाठी 29 फेब्रुवारी ही तारीख ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यात पीक कर्ज आणि ट्रॅक्टरसाठी घेण्यात आलेल्या कृषी कर्जावर चक्रवाढ व्याजमाफी लागू होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.