Breaking News

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!

उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान!

- शिवसेनेचा पहिल्यांदाच ऑनलाईन दसरा मेळावा
- नारायण राणेंची बेडकाशी तुलना
- आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत
- महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणार्‍यांच्या छाताडावर गुढीपाडवा साजरा करेन


मुंबई / खास प्रतिनिधी

काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचे ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधकांना दसरा मेळाव्यातून दिले. शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी ५० जणांच्या उपस्थितीत व पहिल्यांदाच ऑनलाईन पार पडला. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित झाली होती. तरीही राज्यभर तो वृत्तवाहिन्या व सोशल मीडियावरून ऑनलाईन प्रसारित झाला होता.
राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली. ते म्हणाले, की अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल, तर मुंगळा कसा डसतो तेही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होते त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील, असे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विशेषतः भाजपला ठणकावले. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरे उघडले नाहीत म्हणून. पण ज्यावेळी बाबरी पाडली, त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाराला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असे ठणकावत आजचा शिवसेनाचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितले, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला. आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवला आहे. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल, अशा शब्दांत ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवरही जोरदार टीका केली. मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर सोडा, पण अधिकृत काश्मीरमध्ये एक तरी इंच जमीन घेऊन दाखवा, मुंबईचे मीठ खायचे आणि नमक हरामी करायची, असा टोला उद्धव ठाकरेंनी कंगना रनौतला लगावला. या मेळाव्यास सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यासह मोजकेच नेते, मंत्री यांची उपस्थिती होती. मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.

सरकार कार्यकाळ पूर्ण करेल : संजय राऊत
याप्रसंगी प्रास्तविक करताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेनेची धोरणे व वाटचाल स्पष्ट केली. ते म्हणाले, ११ कोटी जनतेचे आशीर्वाद या सरकारच्या मागे आहेत. ठाकरे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. जनतेच्या मनात आम्ही आत्मविश्वास निर्माण केला, महाराष्ट्राचे आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, वादळ आणि इतर संकटाला तोंड देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डगमगले नाहीत. चिखलफेक झाली तरी ते राज्याचा कारभार करत आहेत, असेही याप्रसंगी खा. राऊत यांनी सांगितले. शिवसेनेची भविष्यातील वाटचाल ही भव्यदिव्य असेल. गेल्यावर्षी याच दिवसात युद्धाला प्रारंभ झाला. आपण महाराष्ट्रात असत्यावर विजय मिळवून आजचा महाविजयादशमी मेळावा साजरा करत आहोत. त्यामुळे आता यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात ‘महा’राष्ट्र, ‘महा’विकासआघाडी अशा महा (मोठ्या) गोष्टीच घडतील, असेही खा. राऊत यांनी ठणकावले.