Breaking News

फडणवीसांनी जे पेरले तेच उगवतेय!

फोकस/ पुरुषोत्तम सांगळे : 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाचे युग (इरा) संपले आहे; अशी दर्पोक्ती करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उर्मटपणाला एकनाथ खडसे यांच्यासारखे तब्बल चार दशके भाजपचे नेतृत्व करणारे वडिलधारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन जोरदार चपराक बसली असेल. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर फडणवीस यांच्यासारखे उर्मट आणि कावेबाज राजकारण कुणीही केले नाही. त्यांच्या याच राजकारणामुळे त्यांनी जवळचेच सहकारी स्वतःचे शत्रू करून घेतले. आज नाथाभाऊंसारखे नेतृत्व राष्ट्रवादीत आले; भाजपची अर्धेअधिक ताकद संपली. उद्या पंकजा मुंडे-पालवे यादेखील शिवसेनेत गेल्यास कुणाला आश्‍चर्य वाटू नये. पंकजांनी भाजप सोडले तर भाजपमध्ये जनाधार असलेला एकही नेता उरत नाही. जे काही नेते भाजपमध्ये दिसतात; ते एकतर जनाधार नसलेले आहेत किंवा इतर पक्षातून आयात केलेले आहेत. त्यांचा स्वार्थ संपला की, ते कधीही आपल्या मूळ पक्षात परत जाऊ शकतात. आज फडणवीस यांच्या पाठीशी कुणीही नाही; जे त्यांची बाजू घेत आहेत, त्यांच्या पाठिशी जनमत नाही. राजकारणात कोणताही मुख्यमंत्री आपले स्थान बळकट करण्याचा आणि विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न करीत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांना ही कला यशस्वीपणे साधली होती. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनीही हेच केले आणि तोच प्रयोग फडणवीस यांनी राज्यात करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते त्यात तोंडघशी पडले. मुळात फडणवीस हे जनसामान्यांचे नेते नाहीत. ते एका विशिष्ट वर्गाने लादलेले नेते आहेत. ते ज्या ब्राम्हण समाजाचे नेतृत्व करतात, त्या समाजाची तीन-साडेतीन टक्केही मते राज्यात नाहीत. तरीही नरेंद्र मोदींकडे पाहून राज्यात भाजपला मतदान झाले होते. पंकजा मुंडे-पालवे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांच्यासारख्या मास लीडर नेत्यांमुळे भाजपला सत्तेपर्यंत मजल मारता आली. त्यात फडणवीस यांचे म्हणावे तसे काहीच श्रेय नाही. तरीही पक्ष नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्रिपदी संधी दिली. या संधीची खरे तर त्यांनी सोने करणे अपेक्षित होते; पण त्यांनी राज्यात सुडाच्या राजकारणाचा पायंडा पाडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेतृत्व छगन भुजबळ यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न झाले. भुजबळांना तुरुंगात जावे लागले. पण, तशाही परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भुजबळ अडचणीत असतांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता तर त्यांना मंत्रिमंडळात सन्मानाने स्थान देण्यात आले आहे. एकनाथ खडसे हेदेखील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाहीही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिली आहे. उलटपक्षी देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथक (एसआयटी)च्या अध्यक्षपदी कदाचित खडसे यांचीच वर्णीही लागू शकते. तसे झाले तर तो फडणवीसांसाठी दुर्देवी काळ असेल. राज्याच्या राजकारणात सुडाचे राजकारण करताना फडणवीसांनी मुरब्बीपणा दाखवला नाही असे नाही. त्यांनी तो दाखवला; पण त्यात सोयीचे राजकारण हा भाग नव्हता तर ‘ब्राम्हणी कावा’ ज्याला म्हणतात तसे कावेबाज राजकारण होते. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हे त्यांच्यापुढचे मोठे आव्हान होते. नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील हे फडणवीसांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले जातात. यामध्ये गडकरींना केंद्रात वजनदार मंत्रिपद देण्यात आल्याने त्यांचा राज्यात येण्याचा पर्याय मागे पडला. दुसरीकडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे मंत्री एकापाठोपाठ एक वादात अडकत गेले आणि अडचणीत आले. खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि त्यांचे मंत्रिपद काढून घेतले गेले. त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झालाच नाही. नंतर  तर त्यांना विधानसभेची उमेदवारीही मिळू शकली नाही. विनोद तावडे बोगस डिग्री प्रकरण, शालेय उपकरण खरेदीत अनियमिततेचा आरोप यांवरून अडचणीत आले. त्यांनाही विधानसभेची उमेदवारी मिळू शकलेली नाही. आणि, चिक्की घोटाळ्यात पंकजा मुंडे-पालवे या तावून सुलाखून निघाल्या. त्यांचा परळीमध्ये झालेला पराभव नेमका कसा झाला? हे बीडमधील अगदी लहान पोरदेखील सांगू शकते. भाजपच्या नेत्यांचे एक तंत्र असते; ते म्हणजे ऑप्टिक्स. म्हणजे ते काय चित्र रंगवतात ते खूप महत्वाचे असते. खास करून टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर किंवा इतर माध्यमांतून लोकांपुढे जे चित्र निर्माण करतात, त्यामध्ये ते पारंगत असतात. देवेंद्र फडणवीस यांचेही असेच एक चित्र निर्माण करण्यात आले. त्यासाठी प्रसारमाध्यमांतील एक गटच सक्रीय झालेला होता. 2016 मध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना भाजपमध्ये आणून त्यांनी मराठा समाजासमोरही स्वतःचे एक हितैषी चित्र निर्माण केले. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे श्रेय घेऊनही त्यांनी मराठा समाजाची सहानुभूती मिळवली होती. माळी, धनगर, वंजारी असा फॉर्म्युला यापूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. प्रमोद महाजन यांनी राज्यात राबवून भाजपचा जनाधार वाढविला होता. फडणवीस यांनी ‘माधवं’ या फॉर्म्युलाला तडा देत मराठा समाजाला जवळ करण्याची रणनीती आखली. त्यासाठी विखे-मोहिते यांच्यासारखे दिग्गज मराठे त्यांनी पक्षात आणले. अर्थात, ही रणनीती 80 वर्षाच्या चाणाक्ष शरद पवार यांनी उधळून तर लावलीच; परंतु फडणवीस यांना भविष्यात पुन्हा कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही, अशी तरतूद करून ठेवली आहे. फडणवीसांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची गुप्तचर यंत्रणा खूपच मजबूत आहे. त्यातून त्यांच्याविरोधात उभे राहिलेले आंदोलन किंवा चळवळ यातील कच्चे दुवे ते बरोबर शोधतात आणि त्या कच्च्या दुव्याला आपल्याकडे ओढतात. हे त्यांनी शेतकरी आंदोलनात तर केलेच; पण मराठा आंदोलनातही केले होते. 29 जुलै 2014 या दिवशी शरद पवारांच्या बारामतीत धनगरांना अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस हे गेले होते. त्यावेळी फडणवीस यांनी आश्‍वासन दिले होते, की आमचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर ते पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी धनगरांना आरक्षण दिले नाही. विधानसभा निवडणुकीत कुठेही हा मुद्दा प्रभावी असलेला दिसला नाही. उलट धनगर समाजातील एक महत्त्वाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपमध्ये घेऊन त्याच बारामतीत त्यांना अजित पवारांच्या विरोधात उभे करण्यात आले. अर्थात, पडळकरांचे डिपॉझीट जप्त झाले तो भाग अलहिदा. म्हणजे, आश्‍वासने द्यायची आणि नंतर वेळ मारून न्यायची, हेच राजकारण फडणवीसांनी खुबीने केले. त्यामुळे आपण राज्यातील शरद पवार यांच्यापेक्षाही मोठे नेते झालोत; असा उन्माद त्यांना आला होता. या अहंकाराच्या उन्मादातच ‘शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहे.’ असे विधान करुन फडणवीस यांनी आपल्या पायावर धोंडाच पाडून घेतला. 2014 च्या लोकसभेतील स्वबळावरील विजयानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना ‘आपले गुरु’ म्हणून चुचकारले होते याचे विस्मरण फडणवीस यांना झाले व आता फडणवीस यांच्याच राजकारणाचे युग संपण्याची वेळ आली आहे. इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) नेते एकनाथ खडसे यांचा झालेला छळ हा महाराष्ट्र विसरलेला नाही व विसरणारही नाही. वास्तविक पाहाता, आज राज्यात जो काही भाजप उभा आहे, तो फक्त आणि फक्त स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. पांडुरंग फुंडकर, स्व. प्रमोद महाजन व एकनाथ खडसे यांच्यामुळेच उभा आहे. राज्यात भाजपला उभे करण्यात फडणवीस यांचे कोणते योगदान राहिले आहे? त्याच खडसे यांच्यावर पक्ष सोडून जाण्याची वेळ फडणवीस यांनी आणली.  खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने यापुढील राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. तशी चुणूक शरद पवार यांनीच दाखवली आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्यात पवार म्हणाले होते, ‘नाथाभाऊ काय चीज आहे हे लवकर राज्याला कळेल’! याचा अर्थ स्पष्ट आहे; यापुढे फडणवीस यांचे राजकारण संपलेले असेल तर ज्यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न झाला; त्या खडसेंचे राजकारण सुरु झालेले असेल. खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खान्देशात फायदा होणारच आहे. परंतु थेट विदर्भातील मलकापूर, बुलढाणा व अकोला जिल्ह्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषेदवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी पक्षांना प्रत्येकी चार जागा वाट्याला येतात. या जागांतून खडसे यांची विधानपरिषदेत वर्णी लागू शकते. तसे झाले तर त्यांची मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते. खरे तर राज्यात मोठा पक्ष असतानाही भाजप सत्तेवर न येणे, भाजपमध्येच दोन गट सक्रीय असणे, आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जाणे, यामागे केवळ देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तीकेंद्रीत राजकारण कारणीभूत आहे. भाजपला जी उतरती कळा लागली, त्याचे एकमेव कारण फडणवीस आहेत. राजधानी नवी दिल्लीतील नेतृत्वाने अजूनही डोळे उघडावेत. किमान पंकजा मुंडे-पालवे या तरी भाजपमधून बाहेर पडण्याची वाट न पाहता, नेतृत्वात बदल करावा. अन्यथा, पुढील राजकीय वाटचाल कठीण असेल, हे सांगण्याची गरज नसावी!

(लेखक हे दैनिक लोकमंथन वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संपादक आहेत. संपर्क 8087861982)

------------------