Breaking News

मंत्र्यांच्या घरासमोर मराठ्यांचा थाळीनाद

 - केंद्रीयमंत्री दानवे, जयंत पाटील, विश्‍वजित कदमांच्या घरावर मराठे धडकले
- बाळासाहेब थोरातांच्या घरासमोर बहीण-मेव्हण्याचा ठिय्या

मुंबई/ प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलकांनी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर शुक्रवारी ढोलताशा वाजवत थाळीनाद आंदोलन केले. आंदोलकांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्या घरावर धडक देत आरक्षणाची मागणी केली. 

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यापार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी जालन्यात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवून थाळीनादही केला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे आणि एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांना मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलकांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन नाक्याजवळील घरासमोरही जोरदार आंदोलन केले. सांगलीतही आंदोलकांनी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्या घरासमोर आंदोलन करत कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर केल. सकल मराठा समाजाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी हलगी वाजवून आपला रोष व्यक्त केला. तर, नगरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला.


मराठा आरक्षणाची ओवाळणी द्या, बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर बहिणीचा ठिय्या

शिर्डी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर बहिणीनेच ठिय्या मांडला होता. मराठा समाजाला आरक्षणाची ओवाळणी देण्याची गळ यावेळी दुर्गा तांबे यांनी भावाला घातली. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जवळपास एक तासभर ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे, या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि मेव्हणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही सहभाग घेतला होता.