Breaking News

बळीराजाच्या डोळ्यात पाणी; शेतीपिके, फळभाज्या, द्राक्ष बागांचे कोट्यवधींचे नुकसान

- पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
- पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पाऊस : हवामान खाते
- नदी नाल्यांना पूर, अनेक मार्ग बंदमुंबई/ पुणे : विशेष प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मुंबई, पुण्यात धो धो पाऊस कोसळत असून, गुरुवारीही राज्यात त्याचा धुमाकूळ कायम होता. शुक्रवारीदेखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाने सोयाबीन, टोमॅटो, ढोबळी मिरची, द्राक्षे व इतर फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्यासह खरिपातील काढणीला आलेली पिके यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, ही पिके घेणारा शेतकरी या पावसाने अक्षरशः रडकुंडीला आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार, 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यात किनारपट्टीलगच्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये पावसाचा जोर गुरुवारीदेखील कायम होता. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने शेतीपिकांच्या नुकसानीसह मोठी जीवितहानीदेखील झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली होती. हा पट्टा आता अधिक तीव्र झाला असल्याने देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुण्याला बुधवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपले. त्यामुळे घराघरांत पाणी शिरले होते. ही परिस्थिती पाहता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. गुरुवारी होणार्‍या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

ऊस, कांदा, डाळिंब, सोयाबीन, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान

कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याच्या भागात मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. गुरुवारीही दिवसभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.