Breaking News

लॉकडाऊन संपला, कोरोना नाही!

- सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
- कोरोनावरील लसीचे सर्वांना वितरण करण्यासाठी नियोजन सुरु
- जगापेक्षा आपल्याकडे कोरोनाने बळींची संख्या कमी
- पंतप्रधानांनी दूरचित्रवाणीद्वारे साधला देशवासीयांशी संवादनवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधी

देशातील लॉकडाऊन संपला आहे, पण देशात आजही कोरोना विषाणू अस्तित्वात आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गर्दी करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मोदींनी देशाला संबोधित केले. कोरोना संकट व इतर महत्वाचे मुद्दे पाहाता, मोदी काही दिलासादायक घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, 25 मिनिटांच्या भाषणात त्यांनी ठोस काहीही न बोलता देशवासीयांचा भ्रमनिराश केला.

कोरोना संकटाच्या काळात मोदींनी यापूर्वी सहावेळा देशवासीयांना संबोधित केले होते. मंगळवारी सातव्यांदा ते जनतेसमोर आले. मोदी म्हणाले, लॉकडाऊन संपुष्टात आणले आहे. परंतु, देशात आजही कोरोना विषाणू आहे. सणासुदीचे दिवस पाहाता बाजारपेठेत गर्दी करून हे संकट आणखी वाढवू नका. आपल्याला परिस्थिती सुधारायची आहे, बिघडायची नाही. आज देशाचा रिकव्हरी रेट चांगला आहे. भारतात प्रति दहा लाख लोकसंख्येत जवळपास साडेपाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. अमेरिकेत हाच आकडा 25 हजार इतका आहे. दहा लाखांच्या लोकसंख्येत जवळपास मृत्यूदर 83 इतका कमी आहे, अमेरिकेत हाच आकडा 600च्या पुढे आहे.  आपण या संकटावर यशस्वी मात करत आहोत. आपल्याकडे 12 हजार क्वारंटाईन सेंटर्स आहेत. दोन हजार टेस्टींग लॅब आहेत. टेस्टची वाढणारी संख्या ही ताकद आहे. तरीही आपण बेफिकीर राहण्याची गरज नाही. डॉक्टर्स, नर्स व कोरोना योद्ध्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच हे संकट निवारणे काहीच दूर आहे. कोरोनावरील लस जेव्हाही येईल, तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक नागरिकांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. यावेळी त्यांनी मीडिया, सोशल मीडिया व नागरिकांना कोरोनाविषयी जास्तीत जास्त जागृकता निर्माण करण्याचे आवाहन करत, सणांच्या काळात काळजी घेण्याची विनंतीही केली.


देशवासीयांचा भ्रमनिरास!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रासह तेलंगणा, आध्रप्रदेशात झालेले अतिवृष्टी व शेतीपिकांचे झालेले नुकसान, कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी आदी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करतील, अशी देशवासीयांना अपेक्षा होती. परंतु, मोदींनी निव्वळ गोलमाल भाष्य करत कोरोनावरच आपले भाषण गुंडाळले.

------------------