Breaking News

चौघा अल्पवयीन भावंडांची गळे चिरून हत्या

जळगाव हादरले : भादली हत्याकांडाची पुनरावृत्ती


जळगाव/ प्रतिनिधी 

चार अल्पवयीन बालकांची कुर्‍हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात घडली आहे. बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचे सालदारी करणारे कुटुंब राहते. दोन मुले आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकर्‍याने या चारही जणांची कुर्‍हाडीने गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलिस करत आहेत. या थरारक घटनेने भादली घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी जळगाव तालुक्यातील भादली येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. अद्यापपर्यंत हत्या करणार्‍या आरोपींची शोध घेण्यास जिल्हा पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे.

चार मुलांच्या हत्याकांडाची घटना 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मृत मुले ही 8 ते 13 वर्षे वयोगटातील आहेत. या कुटुंबाचे शेतातच वास्तव्य होते. बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. मयताब भिलाला अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी भिलाला 15 ऑक्टोबर रोजी पत्नी आणि एका मुलासह मध्यप्रदेशात गेले होते. तर दोन मुले आणि दोन मुली हे चौघे घरी होते. 16 ऑक्टोबररोजी सकाळी शेख मुश्ताक शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिले असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात भिलाला यांची चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच श्‍वान पथकाही मदत घेतली जात आहे. याशिवाय, गावकर्‍यांची चौकशी केली जात असून, या कुटुंबाचे इतर कोणाशी वैर होते का? याची माहितीही पोलिस घेत आहेत. दरम्यान, आरोपी लवकरच पकडला जाईल, असा दावा पोलिस करत आहेत. जळगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेने हादरवले आहे. या घटनेनंतर गावकर्‍यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावून आरोपींना जेरबंद करावा, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.