Breaking News

लोकशाही मुर्दाड झाली !

 लोकशाही मुर्दाड झाली !


जगाच्या पाठीवर सर्वात लवचिक मानली जाणारी भारतीय लोकशाही दिवसेंदिवस रूक्ष, मुर्दाड बनवली जाऊ लागली आहे. लोकशाहीच्या धमन्यांमधले थेंबथेंब रक्त शोषून संवेदना ठार मारल्या जात आहेत. भारताच्या लेकीबाळींवर नव्हे तर लोकशाहीवर दिवसाढवळ्या बलात्कार होऊ लागले आहेत.

ज्या क्षणी राहुल गांधींना रस्त्यावरील भुरट्या गुंडाप्रमाणे वागणुक दिली, धक्काबुक्की करण्यात आली, त्यांना खाली पाडण्यात आले त्याच क्षणी या देशातील सुसंस्कृत राजकारणाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला गेला आहे. राहूल गांधी, गांधी कुटूंबाचे सदस्य आहेत, लोकसभेचे सदस्य आहेत, एका प्रमुख विरोधी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत म्हणून तर आहेच, पण भारताचे नागरिक म्हणूनही त्यांचा अधिकार हिरावून घेत योगी सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. 


आपण लोकशाही संघराज्यात रहातो की तालिबान्यांच्या अफगाणीस्तानात?  असा गंभीर सवाल भारताचा प्रत्येक सच्चा नागरिक एकमेकांना विचारू लागला आहे. अर्थात या प्रश्नकर्त्यांमध्ये भक्त मंडळींचा अंतर्भाव अजिबात नाही. असणे अपेक्षीतही नाही. याचा अर्थ आम्ही त्यांना सच्चा भारतीय मानत नाही असा अजिबात नाही, त्यांची भक्ती कितीही अंध आणि निष्ठूर असली तरी आम्ही त्यांना राष्ट्रद्रोही मानणार नाही, आमचे ते संस्कार नाहीत. असो.


आपला मुळ मुद्दा लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे. आता ही अवदसा आम्हाला का आठवली असा प्रश्न त्या अंधभक्तांना नक्कीच पडू शकतो. कारण कथित राष्ट्रवादाच्या भक्तीनं अंध झालेल्या या भक्तांना देशभरात सुरू असलेला हैदोस दिसत नाही. दिसणारही नाही. माञ देशाच्या कानाकोपऱ्यात घडत असलेल्या भयानक घटनांनी सच्चा भारतीय अस्वस्थ झाला आहे. भवताल व्यापलेली घृणास्पद दृश्य पाहून तुमच्या आमच्या  तळपायाला लागलेली आग डोक्यात शिरली नाही तर तालिबान्यांनी आपले अभिनंदनच करायला हवे.

प्रभु रामचंद्रांचा पुण्यवारसा सांगणारे भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळख असलेले उत्तर प्रदेश गुन्हेगारी क्षेञात विकसीत आहे.ही ओळख प्रत्येक एका नव्या घटनेने आणखी दृढ होऊ लागली आहे.ज्या प्रभु रामचंद्रांचा जप करून भारतीय जनता पक्षाने देशाची आणि उत्तर प्रदेशची सत्ता हस्तगत केली त्या प्रभुरामचंद्रांना देश मर्यादा पुरूषोत्तम म्हणून पुजतो.स्रीयांविषयी प्रभूंना असलेला आदर आम्ही पामरांनी काय सांगावा? याविषयी सत्ताधारी चांगलेच अवगत आहेत.या प्रभुरामचंद्रांची अयोध्या उत्तर प्रदेशातच आहे.आपल्या आराध्य दैवताची मायभूमी असलेल्या राज्यात स्री जातीचा सन्मान होत नसेल तर जन्मभुमीचा वाद जिंकण्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा अधिकार यांना नाहीच.याहीपुढे जाऊन विद्यमान मुख्यमंञी योगी आदित्यनाथ आपल्या राज्यातील नागरीकांना विशेषताः स्रियांना  न्याय,सन्मान आणि समानतेची वागणूक देऊ शकत नसतील तर वारंवार छञपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही त्यांना अधिकार नाही.

महिलांवर अत्याचार होण्याच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत.उन्नावसारखे असंख्य प्रकरणे न्यायाची वाट पहात असतानाच हाथसरचे प्रकरण सध्या योगीराजमधील जंगली श्वापदांचा हैदोस चव्हाट्यावर आणीत आहे.या घटनेत नरपशू गुन्हेगार दोषी आहेतच,पण त्याहूनही यांञणेने दाखवलेला करंटेपणा कितीतरी अधिक दोषी आहे.काय घडले याविषयीचा घटनाक्रम सारा देश जाणतोच आहे.त्याचा पुर्नउल्लेख करण्यात कुठलेच हशील नाही.माञ घटनेपश्चात होत असलेल्या घडामोडी अधिक क्लेशदायक आहेत.पोलीस यंञणेने केलेले पाप लपविण्यासाठी सुरू झालेला कांगावा घटनेपेक्षाही अमानुष म्हणावा लागेल.जीवंतपणी सन्मान तर दिला नाहीच मरणानंतरही त्या भगीनीला छळण्यात कुठलीच कसर सोडली नाही.

कुठलाही संवेदनशील भारातीय नागरीक या घटनाक्रमावर उत्तेजीत होऊन क्रोधीत झाला नाही तर नवलच.राहूल गांधी पप्पू असले तरी या देशाचे जबाबदार नेते आहेत,खासदार आहेत.याहीपेक्षा उत्तरप्रदेशचे भुमीपुञ आहेत.त्यांना त्या भगीनीच्या कुटूंबियांच्या वेदना जाणून घेण्याचा पुर्ण अधिकार आहे,तो अधिकार जंगलराजने आज नाकारला ,यापेक्षा लोकशाहीचे आणखी वेगळे दुर्दैव कोणते असू शकते.केवळ अधिकार नाकारला नाही तर एखाद्या सराईत गुंडापेक्षाही थर्ड डिग्री वागणूक यंञणेने त्यांना दिली.अर्थात आम्ही यात यंञणेचा तसूभरही दोष मानीत नाही.यंञणा सात्ताधाऱ्यांच्या इशारावर नाचणारी कठपुतली असते.त्यांनाही त्यांच्या आशा अपेक्षा आहेत.त्या पुर्तीसाठी तालावर नाचून लोकशाहीचा बळी तर द्यावा लागणारच ना?