Breaking News

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना फटकारले

- राज्यपालांच्या पत्राला खरमरीत पत्राने प्रत्युत्तर

- मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्‍याचे हसत स्वागत करणे 

  माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही : ठाकरेंचा टोला


मुंबई/ प्रतिनिधी 

राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही खोचक प्रश्‍न विचारले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली होते. बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरे सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का? असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले होते. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत पत्र लिहून प्रत्युत्तर दिले. शिवाय, माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत राज्यपालांना फटकारले. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्‍यांचे (अभिनेत्री कंगना राणावत) घरात हसत हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला.

राज्यात मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे गेले होते. तसेच, मंगळवारी राज्यभर आंदोलनेही करण्यात आली. यापार्श्‍वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. ’ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्येत श्रीराम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पूजा केली होती. अशी आठवणच राज्यपालांनी करून दिली होती. खुद्द राज्यपालांनी अशा शब्दात पत्र लिहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पत्राला जशाच तशा भाषेत उत्तर दिले आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणार्‍याचे हसत-खेळत स्वागत करणे माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिले आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. आपण म्हणता गेल्या तीन महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील तीन पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना हाणला आहे. 


संजय राऊत ’मातोश्री’वर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. यात कोरोना ते कंगना रनौत यासह अनेक मुद्द्यांवर ठाकरे शैलीत मत मांडले आहे. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात असा शाब्दिक संघर्ष झडल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेहोते. या भेटीत दोन्ही नेत्यांनी आगामी रणनीतीवर चर्चा केली. तसेच, बिहार निवडणूक, भाजपचे मंदिर सुरु करण्यासाठीचे आंदोलन यांसह विविध मुद्द्यांवरदेखील यावेळी चर्चा झाली असल्याचे सूत्राने सांगितले.