Breaking News

जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न; भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूकजळगाव : राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून, देवेंद्र फडणवीसांमुळे राजीनामा देत असल्याचे खडसेंनी सांगितले. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचे खडसे म्हणाले. त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अत्यंत भावूक होत खडसे म्हणाले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखे आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळाले किंवा नाही मिळाले याचे दुख नाही, मी माझ्या ताकतीने ते मिळवले, असेही खडसे म्हणाले. दरम्यान, खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर जळगावसह मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या समर्थक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे: अर्जुन खोतकर 

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाल्यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होत आहे, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा यांनी शिवसेनेत येण्याची विनंती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे.