Breaking News

कांद्याचे लिलाव सुरु; भाव पुन्हा कोसळले

- शरद पवार, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी

- केंद्राने केला राज्यात कांद्याचा वांदा!


नाशिक/प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांद्याचे बंद पडलेले लिलाव पुन्हा सुरु झाले आहेत. परंतु, कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. लासलगाव बाजार समितीत 142 वाहनातून 1500 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला जास्तीत जास्त 5912 रूपये, तर सरासरी 5100 रूपये दर मिळाला. जवळपास दीड हजार रूपयांनी कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही. 

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी  संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तसेच लासलगाव मर्चंटस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने 23 ऑक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 03 अन्वये आदेश काढून कांद्याचा जीवनावश्यक सूचित समावेश केला. तसेच या अंतर्गत घाऊक व्यापार्‍यांना 25 मेट्रिक टनांपर्यंत तर किरकोळ व्यापारी वर्गाला फक्त दोन टनांपर्यंत कांदा साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यात व्यापार्‍यांनी कांदा खरेदी बंद केली होती. या पार्श्‍वभूमीवर काल कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संघटनाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व आपापल्या अडचणी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या.  मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, व्यापारी संघटनानी कांदा लिलाव सुरु केले आहेत. 

केंद्र सरकार एक लाख टन कांदा आयात करणार

देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयातीला परवानगी दिली आहे. केंद्र सरकार एक लाख टन कांदा आयात करण्याची शक्यता आहे,  अशी माहिती सरकारी अधिकार्‍यांनी दिली. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा कमी झाल्याने दरात झालेली वाढ नियंत्रणात आणण्यासाठी अफगाणिस्तान आणि इतर देशांतून कांदा आयात करण्यात येणार आहे. सरकारच्या एमएमटीसी मार्फत ही कांदा आयात केली जाणार असून, अफगाणिस्तान लवकरच रस्तेमागे कांदा निर्यात सुरू करणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.