Breaking News

कोतकर, लामखडेंनी जमीन हडपली!

- पीडित बन्सी भनगडेंचा आरोप

- कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

- पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

अहमदनगर/ प्रतिनिधी

महसूल खात्यातील अधिकारी व पोलिस अधिकारी यांना हाताशी धरून, तसेच बेदम मारहाण करत खून करण्याची धमकी देऊन माधव एकनाथ कोतकर, माधव भाऊ लामखडे, अजित माधवराव लामखडे यांनी आपल्या पत्नीची जमीन हडपली असल्याची गंभीर तक्रार बन्सी हरी भनगडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशाराही भनगडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन भनगडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही पाठवले आहे.

पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की निंबळक येथील काशिनाथ भाऊ ढोरजकर यांच्या नावे असलेली शेतजमीन व संपत्तीचा त्यांच्या तीन मुली अनुक्रमे पार्वती बन्सी भनगडे, अनुसया सुखदेव कुर्‍हे व बबई मारूती कोतकर यांना कायदेशीररित्या समान हिस्सा मिळायला हवा होता. परंतु, माधव एकनाथ कोतकर, माधव भाऊ लामखडे, अजित माधवराव कोतकर यांनी ढवळपुरी व धोत्रा बुद्रूक येथील शेतजमिनीत ढवळाढवळ केली व अफरातफर केली. या तिघांच्या या मिळकतीशी काहीएक संबंध नसताना त्यांनी महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांना हाताशी धरून माझी पत्नी पार्वती बन्सी भनगडे यांची जमीन आम्हाला धाक दडप तसेच बेदम मारहाण करून व खून करण्याची धमकी देऊन बळजबरी नावे करून घेतली. तरी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी व या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अन्यथा, 25 ऑक्टोबर 2020 पासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही भनगडे यांनी दिला आहे. या बाबतची तक्रार त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधीक्षक याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे.