Breaking News

उद्याचा महाराष्ट्र बंद मागे!

 मराठ्यांचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार!
- खासदार छत्रपती उदयनराजेंचा इशारा

- एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

- रात्री झालेल्या बैठकीत मराठ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य


मुंबई/ विशेष प्रतिनिधी  

महाराष्ट्र आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, सरकारने मराठा बांधवांची परीक्षा पाहू नये, मराठा समाजाच्या प्रश्‍नांवर तातडीने तोडगा काढावा. अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.  दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर बंद मागे घेण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. राज्य सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने 10 ऑक्टोबरचा बंद मागे घेतला असल्याचे सकल मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी जाहीर केले.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारला आव्हान दिले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली. तरीही सरकारने 11 ऑक्टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परीक्षा घेण्याची एवढी घाई का? जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.  येत्या 11 तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच 15 हजार जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठा संताप निर्माण झाला आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय घेण्याचे धाडस करू नये. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घेता येतील. तसेच विद्यार्थ्यांची अशा परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वानाच संधी मिळेल, अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळे कोणाचीही संधी हुकणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घोषित करावा. याशिवाय कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. तसेच परीक्षेसाठी पोषक असे वातावरण नसताना सरकार या परीक्षा कशासाठी घेत आहे? परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार राहणार? त्यामुळे सरकारने या परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.


आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेल; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

उस्मानाबाद : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसर्‍या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेल, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.