Breaking News

ऊसतोड कामगारांनो संप सुरूच ठेवा!

 - प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

- नातेवाईकांच्या युनियनबरोबरचा करार अमान्य


पाटणा/ प्रतिनिधी

ऊसतोड कामगारांच्या झालेल्या कराराला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. नातेवाईकांच्या युनियनबरोब झालेला हा करार असून हा करार आम्हाला अमान्य आहे. या करारातून ऊसतोड कामगारांच्या हातात काहीच पडणार नाही. या कराराव सह्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा करार मान्य करू नका, आणि संप सुरूच ठेवा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पाटणा येथे आले आहेत. त्यांनी एका व्हिडीओ ट्विटद्वारे ऊसतोड कामगारांसाठी झालेला करार अमान्य असल्याचे म्हटले आहे. पुण्याच्या साखर संकुलात झालेला करार हा नातेवाईकांच्या युनियन्सनी केलेला करार आहे. हा करार ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादम या सर्वांच्या विरोधातील आहे. या करारातून काहीही वाढ मिळालेली नाही. या करारावर सह्याही झालेल्या नाहीत. ऊसतोड कामगारांना नुसतेच वापरून घेतले जात आहे. त्यामुळे करार मान्य करू नका. कामावर जाऊ नका. हा संप वाढवा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा प्रश्‍न आणखी चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस आदी नेत्यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. त्यात ऊसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला होता.