Breaking News

'कोरोना झाल्यास ममता बॅनर्जींना मिठी मारेन', इशारा देणारा भाजप नेता कोरोना पॉझिटिव्ह

 

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव आणि माजी खासदार अनुपम हाजरा  यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन ते चर्चेत आले होते. 'मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन', असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर आता त्यांना कोरोना झाल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.  

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांपैकी बऱ्याच जणांनी चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते. या बैठकीनंतर अनुपम हाजरा यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की 'आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षा जास्त मोठ्या संकटांशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढत आहेत. ते कोरोना महामारीने प्रभावित झालेले नाहीत. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही.'

हाजरा म्हणाले होते की, 'जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही', असा आरोप अनुपम हाजरा यांनी केला होता. दरम्यान हाजरा यांच्या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.


कोण आहेत हाजरा?

अनुपम हाजरा बोलपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पक्षविरोधी कामांमुंळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यांनी भाजपकडून मार्च 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जादवपूरमधून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला होता. आता भाजपने त्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.