Breaking News

अग्रलेख/ हा फडणवीसांच्या बेरकी राजकारणाला अपशकुन!

अग्रलेख
हा फडणवीसांच्या बेरकी राजकारणाला अपशकुन!


अखेर तळ्यात मळ्यात करत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयार झाले आहेत. ते भाजपचा त्याग करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देऊन, याबाबतच्या चर्चेवर अखेर पडदा टाकला. खडसे यांच्यासारखा जुनाजाणता नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असल्याने पक्षाला त्याचा फायदाच होईल; दुसरीकडे खडसे भाजपातून बाहेर जात असल्याने त्याचा देवेंद्र फडणवीस यांनाही फायदाच होईल. राजकारण हे फार बेरकी असते. खडसेंचा पत्ता कट करून फडणवीसांनी आपल्या ब्राम्हणी डोक्याने पक्षातील एक मोठा शत्रू कायमचा बाद केला. 

खरे तर राजकारणात कोणताही मुख्यमंत्री आपले स्थान बळकट करण्याचा आणि विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न करीत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांना ही कला यशस्वीपणे साधली होती. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनीही हेच केले आणि तीच कला देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्रीपदी असताना साधली होती. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे-पालवे, विनोद तावडे यांच्यासारख्या बहुजन नेत्यांचा मोठ्या हुशारीने आणि ब्राम्हणी काव्याने पत्ता कट केला. उलट दिल्लीतील मोदी-शाह यांच्यासमोर स्वतःची प्रभावी, हुशार व मुत्सद्दी राजकारणी अशी प्रतिमा तयार केली. त्यामुळेच ते आता राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी तर आहेच; पण स्व. प्रमोद महाजन यांच्याप्रमाणे दिल्लीतील राजकारणातही चांगले वजन तयार करत आहेत. खरे तर राजकारणातील एक नवखा तरुण नेता हा एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पक्षातच पुरून उरला; ही तशी फडणवीसांसाठी मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खडसे हेच मुख्यमंत्री होतील, अशी एक ठळक अटकळ होती. परंतु, भाजपने बहुजन नेत्याला डावलून ब्राम्हण समाजाचे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अगदी अचानकपणे मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे खडसे हे तेव्हाच नाराज झाले होते व ते मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीलाही येण्यास तयार नव्हते. त्या काळात त्यांनी भाजप नेतृत्व व रा. स्व. संघावरही चांगलेच तोंडसुख घेतले होते. परंतु, तेव्हा तात्पुरती समजूत काढून त्यांची महसूल, कृषीसारख्या महत्वाच्या मंत्रिपदांवर बोळवण करण्यात आली होती. आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहोत आणि आपण कसे बहुजन समाजाचे नेते आहोत, असे सतत सांगणार्‍या खडसेंना त्यांचे भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरण काढण्यात येऊन दणका देण्यात आला. त्यानंतर त्यांचे मंत्रिपद काढून घेऊन फडणवीस यांनी दुसरा दणका दिला. नंतर तर त्यांची विधानसभेसाठी अगदी शेवटच्याक्षणी उमेदवारीही कापण्यात आली. खडसेंचे महाराष्ट्र व दिल्लीतील राजकीय वजन कमी करण्यात फडणवीस व त्यांचा कंपू कमालीचा यशस्वी झाला. खरे तर त्यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पक्षात येण्याचे आवाहन केले होते. परंतु, खडसे हे अपमानाचा कडू घोट गिळून पक्षनिष्ठेचे तुणतुणे वाजवत बसले. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राज्यातील नेते असतानाही त्यांनी खडसेंच्या पक्षविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करून त्यांना पक्षातच ठेवले. खरे तर ते त्यांना पक्षातून काढू शकत होते. परंतु, त्यांना खडसेंना पक्षातून काढून तशी सहानुभूती द्यायची नव्हती. खडसेंसमोर फडणवीसांनी परिस्थितीच अशी निर्माण केली की, खडसे हे स्वतः पक्ष सोडतील. त्यानुसार आता खडसे यांनी भाजप सोडला आहे. शुक्रवारी ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. म्हणजे, फडणवीस यांचा सुंठेवाचून खोकला गेला. पक्षातील एक प्रबळ प्रतिस्पर्धी संपविण्यात फडणवीस हे यशस्वी झाले आहेत. खडसे भाजपातून गेले हा जसा फडणवीस यांना फायदा झाला तसाच खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले; याचा राष्ट्रवादीलाही फायदाच होणार आहे. आजरोजी खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद क्षीण आहे. खान्देशात  राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एकच आमदार आहे. साधारण 2009 पर्यंत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते. पण कालांतराने ही संख्या घटत गेली. शिवसेनेने मात्र आपले पाच आमदार कायम राखण्यात यश मिळवले. ही राजकीय ताकद आता जळगाव, धुळे, नंदुरबार व नजीकच्या नाशिक, बुलडाणा जिल्ह्यातही वाढविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे यशस्वी होईल. वास्तविक पाहाता, उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले आहेत. शिवसेनेचे जळगावचे नेते व  माजी आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात. शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. खडसे हे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी त्यांची ओळख आहे. परंतु, खडसे यांनी कधीच शिवसेनेला सहकार्य केले नव्हते. उत्तर महाराष्ट्रात युतीच्या काळातही  खडसेंनी शिवसेनेला दूर लोटण्याचेच काम केले होते. तसेच, जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना आणि खडसे आमने-सामने राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून त्यांच्या सून रक्षा खडसे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी युती असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रचारासाठी मदत करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली होती. परंतु, आता राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्याने खडसेंना शिवसेनेलासोबत घेऊन राजकारण करावे लागेल. झाले गेले विसरून तीनही पक्षांना सोबत राजकीय व्यूहरचना आखावी लागणार असून, खान्देशातून भाजपला हद्दपार करण्यासाठी नवी रणनीती तयार करावी लागणार आहे. या रणनीतीचे नेतृत्व अर्थातच एकनाथ खडसे यांना करावे लागेल. भाजपातून बाहेर पडून खडसेंचा राजकीय प्रवास यशस्वी झाला तर भविष्यात लोकनेत्या असलेल्या पंकजा मुंडे-पालवे यांचीदेखील वाटचाल शिवसेनेकडे होऊ शकते. तसे झाले तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे-पालवे हे बहीण-भाऊ एकाच मंत्रिमंडळात पहायलादेखील मिळू शकेल.  देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना राजकारणातून संपविण्यासाठी जोरदार कावेबाज राजकारण केले. परंतु, संपतील ते खडसे कसले? एक चालकानुवर्ती आणि पक्षातील एकमेव नेता असे रा. स्व. संघाची परंपरा सांगणारे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच आपले स्थान महाराष्ट्रात निर्माण करण्यात फडणवीस यशस्वी होऊ शकले नाहीत. आणि, जोपर्यंत शरद पवार जीवंत आहेत; तोपर्यंत तरी फडणवीस हे महाराष्ट्रातील यशस्वी राजकारणी होऊ शकणार नाहीत. राज्यात फक्त मी आहे आणि बाकीच्यांनी फक्त सहाय्यकाची भूमिका करावी, असा त्यांचा तोरा आता खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने मोडून पडणार आहे. आज खडसे बाहेर पडले, उद्या आणखी दिग्गज नेतेही महाविकास आघाडीची पायवाट चालू शकतात!

----------------