Breaking News

अभिनेत्री दीपाली सय्यदला बलात्काराची धमकी

- नगरमधील तरुणाविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

- न्यायालयाकडून पोलिस कोठडीत रवानगीअहमदनगर/ प्रतिनिधी 

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद हिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, रविवारी अहमदनगर येथून एका 28 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप मच्छिंद्र वाघ असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षभरापासून तो सय्यद हिला त्रास देत आहे. ऑगस्ट 2019 मध्ये अहमदनगरमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपाली सय्यद ही गेली होती. त्यावेळी वाघ याने कुणाकडून तरी तिचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर तो कारण नसताना कॉल आणि मेसेज करत होता. त्यावर सय्यदने त्याला ब्लॉक केले. 4 ऑक्टोबरला त्याने पुन्हा कॉल केला. वर्षभरापासून त्रास देणारा वाघ असल्याचे तेव्हा तिला समजले नाही. मी अहमदनगरमधील पाथर्डी येथून बोलत असून, वाढदिवसाच्या पार्टीला येणार का असे त्याने विचारले. त्यावर वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याचे एक लाख रुपये घेत असल्याचे तिने समोरील व्यक्तीला सांगितले. या एक लाख रुपयात काय काय करणार? अशा प्रकारे तो अश्‍लील बोलला. तसेच, वाघ याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाघ याने शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे दीपालीने त्याला बजावले. त्यावर बलात्कार करण्याची आणि अहमदनगरमध्ये आली तर ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली. या प्रकारानंतर दीपालीने तिच्या भावाशी संपर्क साधून सर्व हकिकत सांगितली. तिने आरोपीचा क्रमांकही भावाला दिला. त्यानेही संपर्क साधून विचारले. त्यावर त्याला शिवीगाळ केली. ती ड्रग पुरवते असे खोटेही त्याने तिच्याबद्दल सांगितले. अखेर दीपालीने ओशिवरा पोलिस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी वाघ याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

-------------------