Breaking News

रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर

मुंबई/ प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला. 

न्यायालयाने रियाला घातलेल्या शर्तीनुसार, रियाने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे तिने आपला पासपोर्ट जमा करणेदेखील गरजेचे आहे. तसेच तिला परवानगीशिवाय भारताबाहेर प्रवास करण्यास मनाई आहे. मुंबईच्या बाहेर जाताना तिने तपास यंत्रणेला सूचना देणेही बंधनकारक आहे. दरम्यान, या प्रकरणातील अब्दुल परिहार आणि शौविक या दोघांचा जमीन अर्ज फेटाळून लावण्यात आला असून, रियाला एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 29 दिवसांनंतर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी जुन्या व्हाटसअप चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली होती. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 पैकी तीन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.