Breaking News

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची ऑफर नाकारली

 - विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचा गौप्यस्फोट


मुंबई/ प्रतिनिधी

राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसने विधानपरिषदेवर जाणार का? अशी विचारणा केली असता उर्मिलाने स्पष्टपणे नकार दिला आहे.

काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत नकार दिला. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. उर्मिला मातोंडकर 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर पाठवावे असे शिवसेनेला वाटणे स्वाभाविक आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून  उमेदवारी देण्यासंबंधी विचारण्यात आले असता, त्यांनी सांगितले की, यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रिमंडळाने अधिकार दिले आहेत.