Breaking News

माजी सैनिकाची म्हसणे तलाठी कार्यालयात अडवणूक; थेट तहसीलदारांकडे तक्रार.

माजी सैनिकाची म्हसणे तलाठी कार्यालयात अडवणूक; थेट तहसीलदारांकडे तक्रार.
-------------
तहसीलदारांनी तलाठी यांना कामकाजात टाळाटाळ करत असल्याबाबत काढले नोटीस.
-------------
म्हसणे येथील तलाठ्यावर तहसीलदारांकडून होणाऱ्या कारवाई कडे तालुक्‍यातील नागरिकांचे लक्ष!


पारनेर प्रतिनिधी :
 पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील एका माजी सैनिकाच्या उताऱ्यावरील इतर अधिकाराची नावे कमी करून घेण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये अनेक वेळा हेलपाटे मारले मात्र काम झाले नाही उलट जाणून बुजून या माजी सैनिकाचे काम टाळण्याचा प्रकार म्हसणे येथील तलाठी कार्यालयातून करण्यात आला याबाबत या माजी सैनिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली व जाणून बुजून तलाठी अडवणूक व टाळाटाळ करत आहे त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी अर्जाद्वारे केली त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हसणे तलाठी श्रीमती एम.बी.साळवे यांना कामकाजात टाळाटाळ करत असले बाबत नोटीस पाठवून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
वडनेर हवेली येथील माजी सैनिक बाबाजी बढे यांनी सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार म्हणून नावे लागली होती ती कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात २९ ऑगस्ट १९ रोजी अर्ज केला होता मात्र अर्जाला अद्यापही तलाठ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्या कामी त्यांना अनेक वेळा तलाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागले असून नाहक त्रास सहन करावा लागला.
तलाठी कार्यालयाच्या गलथान कारभाराचा मनस्ताप या माजी सैनिकाला सहन करावा लागत आहे.अनेक महिने जाऊनही तलाठी कार्यालयात काम न झाल्यामुळे अखेर माजी सैनिकाने तहसीलदारांकडे बाबत तक्रार अर्ज केला व त्यात म्हटले की वारंवार आपण तलाठी कार्यालयात कामासंदर्भात चकरा मारत आहे मात्र तलाठी प्रतिसाद देत नाही कोरोना ची कारणे सांगितली जातात मात्र याच कार्यालयात काही फेर एका दिवसात मंजूर होतात मग हा दुजाभाव का व कशामुळे केला जातो असा सवाल त्यांनी या तक्रार अर्जात केला.
त्यानंतर तहसीलदार देवरे यांनी या तक्रार अर्जाची त्वरित दखल घेत म्हसणे तलाठी यांना नोटीस बजावली असून याबाबत त्वरित अहवाल तहसील कार्यालयामध्ये सादर करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे त्यामुळे म्हसणे येथील तलाठ्यांचा गलथान कारभार उघड झाला असून नेमके ठराविक लोकांना त्वरित मदत करायची व काहींना हेलपाटे मारत झुलवत ठेवायचे हा प्रकार अनेक वेळा पहावयास मिळत आहे त्यामुळे तहसीलदार यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजी सैनिक बाबाजी बढे यांनी केली आहे.

 तलाठी कार्यालयातील कारभारावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यांच्या गलथानपणामुळे नागरिकांना नाहक मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे तालुक्यातील जाणीवपूर्वक काही तलाठी लोकांची पिळवणूक करत आहेत याकडे महसूल प्रशासने लक्ष देणे गरजेचे आहे  म्हसणे तलाठ्यावर तहसीलदार काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 तलाठ्यांनी मुख्यालयी थांबणे बंधनकारक असताना तलाठी मुख्यालयी थांबत नाहीत त्यामुळे नागरिकांना अनेक वेळा कागदपत्रांसाठी गरज असतानाही तलाठी उपलब्ध होत नाहीत फोनवरून मीटिंग किंवा अन्य कामासाठी बाहेर आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिले जातात तर अनेक कार्यालयांमध्ये तलाठी खाजगी व्यक्तीला कामाला ठेवत असतात मात्र असे आढळल्यास त्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते मात्र याकडेही तलाठी दुर्लक्ष करतात.