Breaking News

केंद्राचे काळे कायदे शेतकरी-कामगारांना उद्ध्वस्त करणारे : बाळासाहेब थोरातमुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी केंद्र सरकारच्या कृषी कायदे आणि कामगार कायद्यांवर घणाघाती टीका केली आहे. केंद्र सरकारने आणलेले शेतकरी आणि कामगार कायदे काळे कायदे असून शेतकरी-कामगारांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. हे कायदे फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत,' असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज (8 ऑक्टोबर) मुंबईतील गांधी भवन येथे राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी या कायद्यांबाबत चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी या बैठकीत सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचीही बाजू समजून घेतली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, 'भाजपा सरकारने संसदीय नियम आणि लोकशाहीला पायदळी तुडवून लोकसभा आणि राज्यसभेत कृषी व कामगार कायदे मंजूर केले. हे दोन्ही कायदे कामगार आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळेच आज विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत या संदर्भात चर्चा केली. कामगार कायद्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे.'

'केंद्र सरकारने आणलेले शेतकरी आणि कामगार कायदे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी-कामगारांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आणि त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत. हे कायदे फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत,' अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

'काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कामगारांसोबत'

'मुंबई हे कामगार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. कामगारांना महत्वाचे स्थान हे सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी खूप प्रयत्न, संघर्ष करावे लागले आहेत. कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्याचे काम सुरुवातीला महाराष्ट्रातच झाले. काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कामगारांसोबत आहे. त्यांना संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करत राहिल,' असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबईतील गांधी भवन येथे झालेल्या बैठकीत राज्यातील विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात कामगार नेते आमदार भाई जगताप, विश्वास उटगी, इंटकचे कैलाश कदम, दिवाकर दळवी, निवृत्ती देसाई, ऑल इंडिया ट्रेड युनियनचे कृष्णा भोयर, उदय चौधरी, सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे सईद अहमद, हिंद मजदूर सभेचे सुधाकर अपराज व संजय वढावकर, एक्टूचे उदय भट व विजय कुलकर्णी, AIUTUC चे अनिल त्यागी, राज्य सरकार एम्पल कन्फेडरेशनचे विश्वास काटकर, भारतीय कामगार सेना महासंघाचे संतोष चाळके, न्यू ट्रेंड युनियन (NIUI) चे एम. ए. पाटील व मिलिंद रानडे, श्रमिक एकता संघाचे दिलीप पवार, ट्रेड युनियन सेंटर ऑफ इंडियाचे संजय संघवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांचा समावेश आहे.