Breaking News

कोरोनाने घरातले आधारवड कोसळले, एकापाठोपाठ कुटुंबातील चौघांचा मृत्यू


 जळगाव : जळगावमधील एकाच कुटुंबातील चौघा पुरुषांची प्राणज्योत मालवली, त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोरोना कारणीभूत ठरला. वीस दिवसांच्या काळात अमृतकर कुटुंबातील चौघा जणांचे निधन झाले.  धरणगाव तालुक्यातील साखरे येथील अमृतकर कुटुंब सध्या धरणगावच्या चिंतामणी मोरया परिसरात राहते. अवघ्‍या वीस दिवसात एकापाठोपाठ एक अशा चौघा कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

साखरे (ता. धरणगाव) येथील शेती आणि खत विक्रीच्या दुकानावर आपला उदरनिर्वाह करणारे अमृतकर कुटुंब मेहनती आणि सालस म्हणून ओळखले जाते. सर्वात आधी 75 वर्षीय शांताराम गोपाल अमृतकर यांचे कोरोना सदृश आजाराने निधन झाले.

काकांनंतर 52 वर्षीय सुनील पुंडलिक अमृतकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. जळगावच्या लोकसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना 30 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले. तर त्यांचे 50 वर्षीय बंधू सतीश पुंडलिक अमृतकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. जळगावच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना 1 ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुलांच्या निधनाचा धक्का

दोन मुलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने घरातील ज्येष्ठ असलेले 85 वर्षीय पुंडलिक गोपाल अमृतकर यांचीही हृदयविकाराच्या धक्क्याने प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ एक अमृतकर परिवारावर काळाने असा घाला घातला, की संपूर्ण गावच सुन्न झालं. अमृतकर कुटुंबातील तेरा सदस्‍य आनंदात राहत होते. परंतु नियतीने घाला घातल्‍याने कुटुंबाचा आधार नाहीसा झाला. गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

शेती, व्यवसायासाठी बँका, वि. का. सोसायटी, उसनवार असे कर्ज आहे. अशावेळी घरातील महिला आणि लहान मुलांनी हा भार कसा पेलायचा, हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे. शासनाने, समाजातील दानशूर व्यक्तींनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे.