Breaking News

तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला "उभारी" देण्यासाठी प्रशासन व सेवाभावी संस्थाचा पुढाकार!

तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला "उभारी" देण्यासाठी प्रशासन व सेवाभावी संस्थाचा पुढाकार!
------–-------
निलेश लंके यांनी दिला आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना उभारी घेण्यासाठी आधार.
---------------
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वृद्ध आजी व नातवाचे दुःख पाहून पथकही भारावले.
---------------
सीए व्हायचे अपुरे राहिलेले स्वप्न प्रशासन व सेवाभावी संस्था करणार पूर्ण.


पारनेर प्रतिनिधी - 
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने उभारी मोहीम राबवली आहे त्यानुसार पारनेर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाना भेट देऊन ते कुटुंब सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या मोहिमेची सुरुवात पारनेर येथून तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने सहाय्यक निबंदक सोमवंशी निलेश लंके प्रतिष्ठाण चे ॲड.सरपंच राहुल झावरे उद्योजक सुरेश धूरपते प्रतिष्ठान चे युवक अध्यक्ष विजय औटी डॉ. बाबासाहेब कावरे चिंचोली उपसरपंच रामदास दाते ग्रामविकास अधिकारी स्वप्निल आंबेडकर आदी उपस्थित होते.
पारनेर तालुक्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले यापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत मिळाली का, कुटुंबांच्या समस्या काय आहेत, कुटुंबप्रमुख कोण आहे, कुटुंब कसे चालते, कोणावर अवलंबून आहे, उदरनिर्वाहाचे साधन आहे काय, या गोष्टी पडताळून कौटुंबिक समस्यांना व उदरनिर्वाहाला सामोरे जात असलेल्या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कुटुंबांचा कल ओळखून त्यांना त्या योजना मिळवून देण्यासाठी सर्वे करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तसेच तालुक्यातील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या शेतकर्‍याच्या कुटुंबाला त्वरित मदत मिळवून देण्याचा प्रयत्न तहसीलदार यांनी केला निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला रोजगारासाठी सुविधा आदी बाबी पुरवण्याचे काम करण्यात आले.
दरम्यान चिंचोली येथील शेतकरी मोहन झंझाड यांनी ३ वर्षापूर्वी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली होती त्या कुटुंबाला उभारी मोहिमेच्या पथकाने भेट दिली यावेळी कुटुंबाची विचारपूस करण्यात आली कुटुंबातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी सुमन झंझाड व मुलगी शुभांगी या दोघी सध्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत शुभांगी चे बीकॉम शिक्षण झाले आहे यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी तिला विचारले की तुझे वडील असते तर तू कोणत्या क्षेत्रात करियर केले असते त्यांनी तुला कुठे पाठवण्यास प्रोत्साहन दिले असते तर त्यावर तिने सांगितले वडील होते तेव्हा मी सीए चा कोर्स करत होते मात्र त्यांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती मुळे तो करता आला नाही यावर तहसीलदारांनी आम्ही तुला सीए होण्यासाठी मदत करू असे सांगितले त्यामुळे शुभांगी चे  सीए बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल.


         अनेक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे तसेच त्यांची मुले भोगतात. त्यांच्या पित्याचे छत्र हरपते, त्या वेळेपासून त्या कुटुंबाच्या मरणयातना सुरू होतात. ज्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी त्या कुटुंबाच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागलेले  असते. कारण त्या शेतकऱ्याचे थकीत कर्ज त्यांनाच फेडावे लागते. थोडय़ा दिवसांनी बँकेचे अधिकारी वसुलीला येतात. खऱ्या मरणयातना त्या शेतकऱ्याच्या कुटुंबालाच भोगाव्या लागतात. यासाठी उभारी ही योजना काम करणार आहे यामधील अधिकारी त्या कुटुंबाच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवणार आहेत.
 दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना वेगवेगळ्या शासकीय
योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,
धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यात ‘ उभारी '
नावाचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या
कुटुंबियांना आत्मनिर्भर करण्याचा विभागीय आयुक्त
राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर करण्यात आला पारनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रशासनाने भेटी दिल्या.
पारनेर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नीलेश लंके प्रतिष्ठान ने साडीचोळी पिठाची गिरणी स्वयंपाकाचा गॅस दिली भेट हा कार्यक्रम पारनेर तहसिल कार्यालयात दि.९ रोजी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी आमदार नीलेश लंके तहसिलदार ज्योती देवरे उद्योजक सुरेश धूरपते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबासाहेब तरटे गटविकास अधिकारी किशोर माने अरुण पवार उपस्थित होते.
घर दुरुस्ती करण्याची जबाबदारी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान यांनी घेतली आमदार नीलेश लंके बोलताना म्हणाले कि यापुढील काळात तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत राहील कधी ही काही अडचण आली तर सांगा मदत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल अडीअडचणी मध्ये मदत केली जाईल व खचून न जाता कुटुंबातील सदस्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे म्हणत त्यांना आमदार लंके यांनी आधार दिला.

 शुभांगीला सीए व्हायचे होते मात्र तिचे अपुरे राहिलेले स्वप्न प्रशासन व सेवाभावी संस्था पूर्ण करणार.
चिंचोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी भगत यांच्या मुलीला सीए बनायचे होते मात्र वडिलांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थितीमुळे तिचे स्वप्न अपुरे राहिले त्यासाठी झावरे प्रोफेशनल अकॅडमी पुणे त्यांच्याशी ॲडव्होकेट राहुल झावरे यांनी संपर्क साधला तहसीलदार देवरे यांनी त्यांना या मुली बाबतची माहिती दिली त्यानंतर अकॅडमीने शुभांगी ला  मोफत सीए चे शिक्षण देण्याचे मान्य केले. तसेच तिचा राहण्याची जेवणाची व्यवस्था चिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश झंझाड करणार आहेत अशी माहिती प्रतिष्ठान युवक तालुकाध्यक्ष विजय औटी यांनी दिली तालुक्यातील सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना मोफत वैद्यकीय सेवा यापुढील काळात पुरवली जाईल असे डॉ. बाळासाहेब कावरे यांनी सांगितले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे दुःख पाहून पथकही भारावले.
या मोहिमेत एका 85 वर्षाची आजी आपल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर आठ वर्षाच्या नातवाला सांभाळत कसेबसे जीवन जगत रोज जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी पैसे नव्हते ८ वर्षांचा नातु शाळा शिकुन किराणा दुकानात ३००० रु रोजाने काम करु लागला व म्हातारी आजारी आजी स्वयंपाक करुन त्याला कसेबसे खाऊ घालत राहीली.गावापासुन खुप दुर एकांतात तोडकेमोडके घर पाऊस आला तर स्वयंपाक ही बंद घरात साप आला की तेवढी जागा लिंपायचाी दोन चार भांडी घरात.आजीच्या अंगात एकमेव फाटका शिवलेला विटलेला काळाकुट्ट गाउन दुर्दैव सोबत घेऊन जगत होते त्यांना उभारी देण्यासाठी पथक गेले आणि आजी ढसाढसा रडु लागली तीच काय पण सर्व पथकच रडले.

 उभारी कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील दुःख जाणून घेण्याची व ते सोडवण्याची जबाबदारी मिळाली हे करत असताना या कुटुंबाचे दुःख खूप वेदनादायी होते हा उपक्रम नसता तर आम्ही कधीही अंधारात असलेल्या या लोकांकडे उजेड बनून पोहचलो नसतो हे कटू सत्य असले तरी मान्य करावे लागेल.
---------------
ज्योती देवरे
 तहसीलदार पारनेर