Breaking News

आ. निलेश लंके यांनी सुरू केलेले शरदचंद्र आरोग्य मंदीर देत आहे राज्यातील रुणांना आधार.

आ. निलेश लंके यांनी सुरू केलेले शरदचंद्र आरोग्य मंदीर देत आहे राज्यातील रुणांना आधार.
----------
1 हजार 150 रूग्ण बरे होउन परतले घरी ; मान्यवरांकडून आ. लंके यांचे कौतुक.


पारनेर प्रतिनिधी :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मोठ मोठया रूग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्यामुळे उपचाराची हेळसांड होउ लागलेल्या रूग्णांसाठी आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलात सुरू करण्यात आलेले शरदचंद्र आरोग्य मंदीर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील रूग्णांसाठी आधार ठरले आहे!
17 ऑगस्ट रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांंच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या या आरोग्य मंदीराचा पहिल्याच दिवसापासून बोलबाला आहे. जिल्हयातील मोठ मोठे कारखानदार कोव्हीड रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येत नसताना सामान्य घरातून आलेल्या आ. लंके यांनी तब्बल 1 हजार बेडचे आरोग्य मंदीर सुरू करण्याचे धाडस केले. तब्बल दिड महिना उलटल्यानंतर या आरोग्यमंदीरातून 1 हजार 150 रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असून आ. लंके यांच्या या धाडसाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सप्रीया सुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले आहे.
आ. लंके यांच्या या आरोग्य मंदीरासाठी कोणतीही शासकिय मदत न घेता स्वखर्चातून, दानशुर व्यक्तींच्या मदतीतून सुविधा पुरविण्यात येत आहेत. सकाळचा नास्ता, चहा, कॉफी, दुध, उकडलेली अंडी, दुपारी व रात्रीचे जेवण याबारोबरच रूग्णास आवश्यक औषधोपचार या मंदीरात पुरविण्यात येत आहेत. मतदार संघातील नागरीकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य मंदीरात दिल्या जाणा-या सुविधांची माहीती आजूबाजूच्या जिल्हयातील रूग्णांपर्यंत पोहचल्यानंतर तेथील रूग्णांनीही या आरोग्य मंदीरात उपचार घेण्याचा आग्रह आ. लंके यांच्याकडे धरला. आ. लंके यांनी मात्र त्यांना नकार न देता त्यांच्याही उपचाराची तेथे सोय करण्यात आली. नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, जुन्नर, शिरूर, संगमनेर, कोपरगांव या आजूबाजूच्या तालुक्यातील रूग्णांसह राज्याच्या विविध भागातील रूग्णांनी आजवर येथे उपचार घेतले आहेत.
विविध आरोग्य सुविधा
आरोग्य मंदीरात स्त्री तसेच पुरूषांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आलेले आहेत. को मॉर्बीड रूग्णांनाही या आरोग्य मंदीरात दाखल करून घेण्यात येते. कोरोना संशयीत रूग्णांची रॅट तसेच आरटीपीसीआर चाचणी मोफत केली जाते. को मॉर्बिड रूग्णांच्या एक्स रे, एच आर सी टी तपासणीचीही सोय करण्यात आली आहे. सामान्य रूग्णांसाठी अ‍ॅझीथ्रोमायसिन, डॉक्झीसायक्लीन, आयव्हरमेक्टीन डायबेटीस मेडीसीन, -हदय रोगाची औषधे, व्हिटॅमिन सी, झीक, पॅरासिटीमॉल, ओमेझ या गोळयांसह डेक्झा, हायड्रोकॉर्ट ही इंजेक्शन्स, प्रोटिन पावडर, गरम पाणी, नेब्युलायझर सुविधा, वाफेची सुविधा, को मॉर्बिड रूग्णांसाठी फॅबीफलु, आयव्हरमेक्टीन, डी 3, झिंक, कफ सिरफ ही औषधे मोफत उपलब्ध करून दिली जातात.

चोविस तास पाहरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी रूग्णांची सेवा करण्यासाठी आरोग्य मंदीरात चोविस तास पाहरा ठेवला आहे. दर बारा तासांनी कार्यकर्त्यांची पाळी बदलली जाते. प्रत्येक कार्यकर्ता रूग्णाची काळजी घेण्याबरोबरच तेथे पडणारे प्रत्येक काम स्वतः करीत आहे.
पत्रकारांचीही काळजी
समाजाच्या विविध घटकांना आरोग्य मंदीराचा लाभ देण्याबरोबरच पत्रकारांच्या आरोग्याचीही आ. लंके यांनी काळजी घेतली. पारनेर तालुक्यासह नगर, पुणे जिल्हयातील पत्रकारांना या आरोग्य मंदीरात उपचार देण्यात आले.

प्रशासनाचाही पुढाकार
आ. लंके यांनी आरोग्य मंदीराच्या माध्यमातून एक प्रकारे प्रशासनास मोठा हातभार लावल्यानंतर प्रशासनाकडूनही आरोग्य मंदीरास मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संंदीप सांगळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, सर्व वैदयकिय अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे. 

कोरोनाच्या काळात मदतीचा हात
परप्रांतीयांना भोजन, वाहनांची सुविधा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आल्यानंतर परप्रांतीय मजुरांच्या जेवणाची हेळसांड होउ लागली. आ. लंके यांनी पुढाकार घेत तब्बल 68 दिवस अडिच ते तिन लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठीही आ. लंके हेच धावून आले. त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी आ.लंके यांनी राज्य पातळीवर संपर्क करून नियोजन केले. विविध राज्यांचे मंत्री, खासदार, आमदार यांनीही आ. लंके यांच्या या  मदतीची दखल घेत कृतज्ञता व्यक्त केली.

ऑलनाईन शाळा

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी ऑनलाईन शाळेचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाची दखल घेत पालकमंत्री तथा राज्याचे  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांनी दखल घेत हा पॅटर्न कोल्हापूर जिल्हयात राबविला आहे.
पोलिस भरतीसाठी खाकी अ‍ॅप
राज्यात मोठी पोलिस भरती होणार असून कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर उमेदवारांना पोलिस  भरतीचे मार्गदर्शन व्हावे, ग्रामिण भागातील विदयार्थी या भरतीपासून वंचित राहू नयेत यासाठी खाकी वर्दी पोलिस अ‍ॅपची निर्मीती करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या अ‍ॅपचे उद्घाटन करून या प्रणालीचा भरतीपश्‍चात प्रशिक्षणात उपयोग करून घेण्याचा मनोदय व्यक्त केला. या अ‍ॅप्लीकेशनचा उपयोग करून सुमारे 21 हजार उमेदवार या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.