Breaking News

पारनेर तहसील कार्यालयात मराठा आरक्षणासाठी चे उद्या धरणे आंदोलन !

पारनेर तहसील कार्यालयात मराठा आरक्षणासाठी चे उद्या धरणे आंदोलन.
------------
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी.
-----------
सोमवार,दि.०५ आक्टोबर, सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन.


पारनेर प्रतिनिधी -
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण खटल्याची जलद सुनावणी व्हावी त्यासाठी राज्य सरकाररने घटनापीठ स्थापन करण्यासाठी आग्रही पाठपुरावा करावा या प्रमुख मागणीसह मराठा समाजाच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी सोमवार,दि.०५ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पारनेर तहसिल कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात एकाच वेळी करण्यात येणाऱ्या या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी पुढील मागण्या राज्य सरकारकडे करण्यात येणार आहेत.
   एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये १२ टक्के जागा मराठा विद्यार्थ्यासाठी वाढवाव्यात.
     मराठा आरक्षणास स्थगिती असे पर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही नोकर भरती करण्यात येऊ नये.
     मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससिच्या परीक्षा घेऊ नयेत.११ आॅक्टोबर २०२० रोजी व नजीकच्या काळात होत असलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.
     केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा.मराठा समाजास EWS मध्ये नव्हे तर हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे.
    दि.९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश देणेपूर्वी सुरु झालेल्या शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या  उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या व लाभ देण्यात यावेत.सदर अन्यायकारक बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
     सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधी देण्यात यावा.
     मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अद्ययावत वस्तीगृहे तात्काळ सुरू करावीत.
     कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींवरील मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरू करावे. वरील मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून शांततेत व संयमाने पाठपुरावा करीत आहे.वरील बहुतांश मागण्यांवर सरकारने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे.मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता वरील मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील असा मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
       कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करीत व्यापक स्वरुपात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.