Breaking News

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम; शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबई/ राजकीय प्रतिनिधी

आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला, असेही ते म्हणाले. एकनाथ खडसे यांनी बुधवारी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला, अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असेही पाटील यांनी नमूद केले. एकनाथ खडसे यांच्यासह आणखी काही जण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. खूप लोक आमच्या पक्षात येणार असे मी म्हणणार नाही. परंतु ज्या नेत्यांना कार्यकर्त्यांचा, जनतेचा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच आमच्या पक्षात यायचे आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.


समर्थकांकडून जल्लोष

दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.


एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपला सोडण्याची अनेक आमदारांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी पक्षांतर केल्यास पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. करोनाच्या संकटाच्या काळात निवडणुका घेणे परवडणार नाही. मात्र, त्यांना मानणारे आमदार कालांतराने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला.

------------