Breaking News

बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह अनेकांची श्रद्धांजली

- 2 नोव्हेंबरला शासकीय इतमामात अंत्यविधी

मुंबई/ प्रतिनिधी

संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली होती. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला होता. डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती.

डॉ. रामराव बापू महाराजांवर 2 नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी गर्दी करू नये, असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, रामराव महाराज यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळपर्यंत मुंबई वरून पोहरागड येथे पोहोचणार होते. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली माहिती दिली.

---------------------