Breaking News

अखेर राहुल, प्रियंकांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

पोलिसांचा काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार, अनेकांना अटक

- हाथरस बलात्कार व खून प्रकरण

- राहुल-प्रियंकांसमोर प्रशासन नमले; पाच जणांसह पीडितेच्या कुटुंबीयांना भेटीस परवानगी

- पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल गांधींचा आधार!

हाथरस/ खास प्रतिनिधी

हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार व नृशंस खून झालेल्या 19 वर्षीय दलित मुलीच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी शनिवारी अखेर पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा हे आपल्या 35 खासदारांसह गेले. त्यांना पुन्हा पोलिसांनी अडवले असता राहुल व प्रियंका हे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटीवर ठाम राहिले. त्यामुळे त्यांच्यासमोर नमते घेत पाच जणांच्या शिष्टमंडळासह या दोघा बहीण-भावाला पोलिसांनी भेटीची परवानगी दिली. गावात जाऊन या दोघांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता, भयभीत कुटुंबाने एकच टाहो फोडला. या कुटुंबाला आधार देत काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिली. तत्पूर्वी, उत्तर प्रदेश पोलिसांनीदेखील पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी दिल्ली-नोएडा महामार्गावर हाथरसकडे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला.

--

बंद खोलीत घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

संध्याकाळी सव्वासात वाजता राहुल व प्रियंका हे पीडितेच्या घरी पोहोचले व त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची बंद खोलीत भेट घेऊन चर्चा केली. या दोघांना पाहून पीडितेच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तर दोघा बहीण-भावांनी त्यांना आधार देत आम्ही व आमचा पक्ष तुमच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही दिली. आमच्या अभागी बहिणीला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाहीही या बहीण-भावाने पीडितेच्या आई, वडिल, भाऊ व कुटुंबीयांना दिली. यावेळी प्रशासनाच्या अत्याचाराचा पाढाही या कुटुंबाने वाचला, असल्याचे सांगण्यात आले.

--

हाथरसला जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी जगातील कोणतीही ताकद मला माझ्या दलित बहिणीच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखू शकत नाही, असे ट्वीट केले होते. तर प्रियंका गांधी-वढेरा यांनी आता यावेळेस जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा येऊ व पीडितेच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे दुःख वाटून घेऊ. त्यानुसार हे दोघे बहीण-भाऊ आपल्या 35 खासदारांसह हाथरसकडे जाण्यासाठी निघाले. परंतु, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा ताफा दिल्ली-नोएडा महामार्गावरच रोखला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. या कार्यकर्ते व नेत्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर राहुल व प्रियंका यांच्यासह केवळ पाच जणांना जाऊ देण्यास पोलिसांनी परवानगी दिली. त्यात काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. पीडितेच्या गावासह संपूर्ण हाथरस जिल्ह्यात राज्य सरकारने कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू केली होती. तसेच, जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. या घटनेवरून पोलिसांवर गंभीर आरोप होत असल्याने राज्य सरकारने पोलिसांसह पीडितेच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पीडितेच्या कुटुंबीयांना सरकार धमक्या देत असल्याचा आरोप प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला आहे. या घटनेला असंवेदनशीलपणे हाताळणारे हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार व पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांना राज्य सरकारने निलंबीत केले असून, त्यांच्याही चौकशीचा निर्णय घेतला आहे.