Breaking News

महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही!

 

- बंद पुकारून काय फायदा होईल?: संभाजीराजेंचा सवाल
- बंद पुकारणारे मराठा समाजाचे नेते नाहीत!

मुंबई/ प्रतिनिधी
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यावर मराठा समाज दुखी होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो आणि तो आपल्याला मान्य करावा लागतो. अशोक चव्हाण यांचा मला फोन आला होता. एक वर्ष मराठा आरक्षणावर स्थगिती आहे तोपर्यंत आपण ईडब्ल्यूएसचे 10 टक्के आरक्षण घेऊ, असे मत त्यांनी व्यक्त केले. मी त्यांना याला नकार दिला. त्यानंतर आम्ही मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ईडब्लूएसचे आरक्षण एका जातीसाठी नाही, ते खुल्या प्रवर्गाती सर्वांसाठी आहे. जर ते आरक्षण घेतले तर सर्वोच्च न्यायालयात आपला कोणताही दावा राहणार नाही. म्हणून मी त्यांना हे आरक्षण घेणे धोक्याचे असल्याचे सांगितले. छत्रपतींच्या घराण्यातील वारस म्हणून मराठा आरक्षणासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. तरुणांनी आत्महत्या करु नये. वर्षभर कळ सोसा. सर्व नीट होईल. आत्महत्या हा पर्याय नाही, असेही संभाजीराजे म्हणाले. 

मराठ्यांना ओबीसींत आरक्षण नको!
ओबीसी आरक्षणात आम्हाला आरक्षण नको. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. ओबीसी नेते मला भेटत आहेत. आजही भेटणार आहेत. धनगर आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. त्यांनी कधीही बोलवावे मी त्यांच्यासोबत आहे, असेही संभाजीराजेंनी नमूद केले.