Breaking News

भारत-चीनशी एकाचवेळी लढण्यास तयार!

- चीन आम्हाला हरवू शकत नाही, लद्दाखमध्ये पोजिशन मजबूत : वायूदलप्रमुख

- भारतीय वायूदलाला राफेल, अपाचे, चिनूकमुळे मिळाली जोरदार ताकद

नवी दिल्ली/ प्रतिनिधी

उत्तरी भागात भारताला हरविण्यासाठी चीनकडे काहीही ठोस पर्याय नाहीत. लद्दाखमध्ये आमची स्थिती मजबूत असून, युद्ध झाले तर चीन व पाकिस्तानसोबत भारतीय वायूदल एकाचवेळी लढू शकते, अशा शब्दांत भारतीय वायूदलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी सोमवारी चीन व पाकिस्तानला ठणकावले. सद्या भारतीय सीमेवर शेजार्‍यांकडून ज्या हालचाली सुरु आहेत, त्या पाहता आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पूर्व लद्दाख सीमेवर चीन बरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भदोरिया यांनी केलेले विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. भारताच्या क्षमतेसमोर चीनची हवाई शक्ती सरस ठरणार नाही. पण त्याचवेळी शत्रूला कमीसुद्धा लेखणार नाही, असे एअरचीफ मार्शल म्हणाले. येत्या 8 ऑक्टोंबरला असणार्‍या एअर फोर्स डेच्या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. परिस्थिती तशी उदभवलीच तर, उत्तर आणि पश्‍चिम सीमेवर एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास इंडियन एअर फोर्स तयार आहे, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. राफेलच्या समावेशामुळे पहिला आणि खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. पुढच्या तीन वर्षात राफेल आणि एलसी- मार्क 1 तेजसची स्क्वाड्रन पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. हवाई दलाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी मिग-29 चा समावेश करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे, असेही भदोरिया यांनी सांगितले. एअर फोर्स डे च्या दिवशी सगळयांच्या नजरा राफेलकडे असतील. राफेल पहिल्यांदाच फ्लायपास्टमध्ये सहभागी होणार आहे. एकूण 56 विमाने सहभाग घेतील. त्यात 19 हेलिकॉप्टर्स आणि सात मालवाहतूक करणारी विमाने आहेत.


एअर फोर्स डेच्या परेडमध्ये राफेल, अपाचे!

पाकिस्तान व चीन यांनी एकाचवेळी भारतावर हल्ला केला तर भारतीय वायूदल या दोन्ही देशांशी एकाचवेळी युद्ध करण्यास सज्ज आहे. आम्ही परिस्थितीचे गांभीर्य पाहून राफेल लढाऊ विमाने, अपाचे व चिनूक हेलिकॉप्टर वायूदलात समावून घेतले आहे. 8 ऑक्टोबरला पहिल्यांदाच राफेल विमाने वायूदलाच्या परेडमध्ये सामील होत आहे. राफेल हे 4.5 जनरेशनचे फायटर विमान असून, हे एअरफोर्स डेच्यानिमित्त परेडमध्ये सहभागी होईल, असेही एअरचीफ मार्शल भादोरिया यांनी सांगितले.