Breaking News

हाथरसला जाणार्‍या राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की, खाली पाडले!

 उत्तरप्रदेश सरकार दादागिरीवर उतरले!

- राहुल गांधी, प्रियांका गांधी-वढेरांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले!

- दलित मुलीवर सामूहिक बलात्कार व नृशंस खून प्रकरण

- उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावती

- देशभर संतापाची लाट; सरकारने मुलीचा मृतदेह गुपचूप जाळलाहाथरस/ विशेष प्रतिनिधी

हाथरस जिल्ह्यातील 19 वर्षीय दलित मुलीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची अत्यंत नृशंस हत्या केली. तिची जीभ कापली, तिची मान मोडली होती. त्यावर कहर म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना न दाखवताच तो रात्रीच्यावेळी गुपचूप जाळला. त्यामुळे देशभर एकच संतापाची लाट उसळली. या मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार्‍या काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांच्यावर पोलिसांनी तर अक्षरशः दादागिरी केली. राहुल व प्रियंका यांना मनाई करत पोलिसांनी महामार्गावरच रोखले. तरीही राहुल गांधी हे हाथरसकडे पायीच निघाले असता, पोलिसांनी त्यांना अक्षरशः धक्काबुक्की केली व खाली पाडले. पोलिसांनी बळाचा वापर करून प्रियंका व राहुल यांना ताब्यात घेत, नंतर त्यांची सुटका केली. या घटनेने काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष संतप्त झाले असून, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. 

हाथरससह सलग दोन दिवसांतील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी उत्तरप्रदेश हादरले आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका  गांधी-वढेरा यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते दलित मुलीच्या पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसच्या दिशेने निघाले असता, हाथरस जिल्ह्याची सीमा पोलिसांनी सील केली व जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले. राहुल-प्रियंका यांचा ताफा जिल्ह्यात दाखल होताच तो पोलिसांनी महामार्गावरच रोखला. त्यामुळे राहुल गांधी हे यमुना दूतग्रती महामार्गाने पायीच हाथरसच्या दिशेने निघाले. ते तीन किलोमीटर जात नाही तोच त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः धक्काबुक्की केली व खाली पाडले. यासोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. तरीही हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेण्यावर राहुल गांधी ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना सक्तीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या दादागिरीबद्दल देशभर एकच संतापाची लाट उसळली. या घटनेने बसपाच्या प्रमुख मायावतीदेखील संतप्त झाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा; किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली. राहुल गांधींनीदेखील हाथरस प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. हाथरस पीडितेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या कुटुंबालादेखील आतमध्ये येण्याची परवानगी दिली गेली नाही. भारताच्या लेकीवर अत्याचार करुन, तिची हत्या केली जाते. सत्य लपवते जाते आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्कदेखील हिरावला जातो आहे. मी तिच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना मला धक्काबुक्की केली जाते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.