Breaking News

आरक्षणावरील स्थगिती उठवा; अन्यथा वणवा भडकेल!

मराठा आरक्षण : मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम- ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा

- बैठकीकडे खा. उदयनराजेंनी फिरवली पाठ; सातार्‍यात मेळावा घेणार

नवी मुंबई/ विशेष प्रतिनिधी 

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यात यावी, अन्यथा वणवा भडकेल, असा इशारा मराठा आंदोलकांनी राज्य व केंद्र सरकारला बुधवारी दिला. मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मराठा समन्वयक चांगलेच आक्रमक झाले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समन्वयक आणि पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त करत येणार्‍या काळात उग्र आंदोलन करण्याचे सूतोवाच केले. दरम्यान, या बैठकीकडे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरवल्याने त्याची चर्चा रंगली होती. 

या बैठकीत एमपीएससी परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली. जर परीक्षा रद्द झाली नाही तर उधळून लावणार असल्याचा इशारा मराठा समजाकडून देण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आणि परीक्षा केंद्रावरसुद्धा आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खरे तर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अशात राज्यात पोलिस भरती आणि एमपीएससीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला डावलले जात असल्याची टीका यावेळी झाली. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्यानिमित्ताने उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले. मी मराठा समाजाचा सेवक आहे म्हणून माझी ही खुर्ची समाजाच्या बरोबर पाहिजे असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी संभाजीराजें दोन मिनिटे संवाद साधून खाली उतरले. तसेच, सर्वोच्च न्यायालयात विविध मराठा संघटनांनी एकत्र  येऊन एकच विधिज्ज्ञ द्यावा आणि पुढे केस चालवावी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात यावी, असेही या चर्चेदरम्यान ठरले. याप्रसंगी उपस्थित खा. हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी नेत्यांनीही मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला.

 

मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ,

उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट!

खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईची वाट न धरता ते थेट नाशिकला गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी 3 ऑक्टोबररोजी पुण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनादेखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती. आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि  खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता उदयनराजे भाजपमध्ये गेले आहेत तर नरेंद्र पाटील हे शिवसेनेतच आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा शिवसेनेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे कुठल्याही एका पक्षासोबत  मराठा समाजाला नेऊन पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे यांनी या बैठकीला न जाणेच पसंत केल्याचे सांगितले जात आहे.