Breaking News

तलवारीचा अर्थ,अन्वयार्थ आणि अनर्थ!

 तलवारीचा अर्थ,अन्वयार्थ आणि अनर्थ!मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून दोन्ही बाजूने जो धुराळा उठवला जात आहे,त्या धुराळ्याने बहुजन समाजाचा सलोखा प्रदुषीत होण्याची भिती  चळवळीतील आमच्यासारख्या असंख्य तटस्थ कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.या ठिकाणी पुन्हा एकदा लोकशाहीच्या छाताडावर बसून अभिव्यक्ती स्वातंञ्याच्या तलवारी परजू लागल्या आहेत.एक दुसऱ्याच्या वक्तव्याचा आपल्याला हवा तो,आपल्या वाटचालीला पुरक ठरणारा अर्थ ,अन्वयार्थ आणि अनर्थ काढला जाऊन बहुजन चळवळीतील माथेफिरूंचे डोके भडकावण्याचे काम काही नादान राजकारणी करू लागले आहेत.आजच्या दखलला.छञपती खा.संभाजीराजे भोसले यांच्या तलवार उपसण्याच्या वक्तव्याचा संदर्भ आहे.आजच्या लोकशाहीत तलवारीचा वापर करणे बोलण्याइतके सोपे नाहीत हे माहीत नसण्याइतपत छञपतींचे वंशज घटना निरक्षर नक्कीच नाहीत.त्यांच्या शब्दांमधून हवा तो अर्थ काढून ओबीसी समाजाला भडकावणाऱ्या प्रतिक्रीया देणारे दोन्ही मंञीही घटना साक्षर आहेत.तरीही हा उपद्व्याप होत असेल तर बहुजन समाजाच्या टाळूवर राजकारणाचे मिरे रगडून सत्तेचा मसाला तयार करण्याचा हा उद्योग बहुजन सलोख्याला बाधल्या शिवाय राहणार नाही.

कोल्हापुरच्या गादीचे वंशज छञपती खा.संभाजी राजे भोसले यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तलवार उपसण्याचे केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या दिशेने नेण्यासाठी भांडवल म्हणून काही कसलेले राजकारणी करू लागले आहेत.वास्तविक चळवळीच्या राजकारणात काही गर्भित शब्दांचा वापर करून चळवळीचा पारंपारिक शञू असलेल्या व्यवस्थेला गारद करण्याचा प्रघात आहे.त्याच गर्भीत अर्थाने खा.संभाजी राजे भोसले यांनी तलवार उपसण्याची भाषा केली असावी असे आमचे प्रांजळ मत आहे.छञपतीं संभाजी भोसले यांचा एकुण जीवन प्रवास बघता बेजबाबदार वक्तव्य करण्याचा प्रमाद त्यांच्या हातून घडणार नाही.इतपत समज त्यांना नक्की आहे.

आयुष्यात काही मिळवायचे असते तेंव्हा कराव्या लागणाऱ्या संघर्षातून झालेल्या मनस्तापामुळे राजकारणातील माणसची जीभ घसरू शकते.राजकारणात खुणावत असलेल्या विविध अमिषामागे धावतांना आणि अस्तित्व टिकवतांना कधी कधी जाणीवपुर्वक बेताल वक्तव्य राजकारण्यांच्या तोंडून सटकू शकते.छञपती मुळात राजकारणी नाहीत.राजकारणात त्यांना काही मिळवायचेही नाही,त्यांना हवे ते त्यांच्याकडे चालून येते.आज ते जिथे आहेत,तिथेच नाही तर कुठल्याही विचारांचा पक्ष छञपतींना हवे ते द्यायाला तयार असतो,मग निव्वळ राजकीय लाभासाठी तलवारीची जहाल भाषा ते वापरतील यावर कुणाही लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास बसणार नाही.मग हा वाद का वाढवला जातोय ? तर त्याचे कारण आहे निव्वळ राजकारण..

खा.संभाजीराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देणारे कोण आहेत?यावर नजर टाकली तरी या मागच्या राजकारणाचे उत्तर सापडू शकते.काँग्रेस,आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही मंञ्यांनी संभाजी राजेंना प्रश्न विचारलाय.,ओबीसींवर तलवार चालवणार का? बालीशपणातून हा प्रश्न विचारला गेला आहे का? तर अजिबात नाही.शुध्द नेतृत्वाच्या राजकारणातून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.संभाजी राजेंना राजश्री शाहू महाराजांचा वारसा आहे.बहुजनांचे प्रतिपालक असलेले,आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांचा सदोदीत गौरव केला जातो त्या राजश्रींचे वंशज म्हणून संभाजी राजेंनीही बहुजन समाजात आपले स्थान बळकट केले आहे.छञपतींनी ज्या अठरा पगड बारा बलुतेदार समाजाच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याच बहुजन समाजाच्या आजच्या पिढीला सोबत घेऊन नवा समाज घडविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.एखाद दुसरा महत्वाकांक्षी पुढाऱ्यांचा अपवाद वगळला तर    सकल बहुजन समाजालाही संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य आहे.आणि हीच बाब राजकारणातील  बहुजन समाजाच्या कथीत नेतृत्वाला टोचत आहे.संभाजीराजेंच्या बहुजन नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले तर या मंडळींची समाजाच्या जीवावर सुरू असलेली राजकीय दुकानदारी बंद होईल ही खरी भिती आहे.ओबीसी समाजावर तलवार चालवण्याइतपत संभाजी राजें राजकीय सामाजिक निरक्षर थोडेच आहेत.व्यवस्थेला भानावर आणण्यासाठी असे गर्भीत अर्थाचे जहाल शब्द चळवळीत वापरावे लागतात.चळवळीचे ते अधिष्ठानच आहे.हे या मंञ्यांना माहीत नाही का? ते ज्या चळवळीतून सत्तेपर्यंत पोहचले त्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीची शिकवण ही मंडळी विषारली आहे का?   सत्तेच्या खाऱ्या पाण्यात गंज चढल्याने मंञ्यांनी आपल्या तलवारी बोथट झाल्या म्हणून म्यान केल्याही असतील म्हणून सकल बहुजन नेतृत्वानेही तलवारी चमकवायच्या नाहीत काय?

केवळ राजकीय हेतूने प्रेरीत होऊन मंञी  शब्दच्छल करीत आहेत, छञपतींच्या बहुजन लोकनेतृत्वामुळे  सामाजिक दुकानदारी कदाचीत धोक्यात येण्याची भिती वाटत असेल म्हणून दिशाभूल करीत आहेत.एव्हढाच काय तो दोन्ही मंञ्यांच्या प्रतिक्रियेचा मतितार्थ.